{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

झरेकाठी । झुंझार न्यूज 

 

जालना जिल्ह्यातील रेशीम शेतकरी आणि उद्योजकांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. जालना येथे नवनिर्मित भव्य ‘रेशीम कोष बाजारपेठ‘ इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिमाखात संपन्न झाले. या सोहळ्याला ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जालना जिल्हा हा मराठवाड्याचे रेशीम उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी हक्काची आणि सुसज्ज बाजारपेठ असावी, अशी मागणी येथील शेतकरी व उद्योजकांनी लावून धरली होती. राज्य सरकारने या मागणीची तातडीने दखल घेत निधी मंजूर केला आणि अत्यल्प काळात ही आधुनिक इमारत उभी राहिली आहे.

लोकार्पण सोहळ्यात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “रेशीम शेती हा केवळ शेतीचा जोडधंदा नसून तो एक शाश्वत उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे. या नवीन बाजारपेठेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला थेट आणि योग्य भाव मिळेल. यामुळे मध्यस्थांची साखळी मोडीत निघेल आणि पारदर्शक व्यवहार होतील, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्तरात मोठी सुधारणा होईल.”

याप्रसंगी अहिल्यानगर येथील युवा उद्योजक ॲड. विवेक लगड पाटील यांनी सर्व रेशीम उद्योजकांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजाताई मुंडे आणि इतर मंत्र्यांचा विशेष सत्कार केला. “या नवीन बाजारपेठेमुळे रेशीम उद्योगाला मोठी उभारी मिळेल आणि सुशिक्षित तरुण मोठ्या संख्येने या व्यवसायाकडे वळतील,” असा विश्वास ॲड. लगड पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

ही नवीन बाजारपेठ केवळ इमारत नसून ते तंत्रज्ञानाने सज्ज असे एक व्यासपीठ आहे. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळणार असून, व्यवस्थापन आणि प्रक्रिया उद्योगातून नवीन रोजगार निर्माण होणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रेशीम उत्पादनांची निर्यात करण्यासाठी ही बाजारपेठ मैलाचा दगड ठरेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

या सोहळ्याला वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, सचिव शैलजा, उपसचिव तुषार पवार, रेशीम संचालक विनय मून, उपसंचालक महेंद्र ढवळे, सहायक संचालक हेमंत लाडगावकर, मराठवाडा विभागाचे रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते, बबनराव डेंगळे यांची उपस्थिती होती. तसेच उद्योजक राजेंद्र लोंढे (स्वराज्य रेशीम केंद्र, जालना), शंकर वराट, श्रीमती आरती वाकुरे यांसह रेशीम विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *