प्रशासनाकडून तीन दिवसांनंतरही तोडगा नाही; उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली
संगमनेर । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी-मांडवे शिवेवर असलेल्या अनधिकृत पोल्ट्री शेडवर कारवाई करावी आणि मानवी आरोग्यास घातक ठरणारे हे शेड सीलबंद करावेत, या मागणीसाठी बिरेवाडी येथील संतोष माणिक गळंगे यांनी १४ ऑगस्टपासून सुरू केलेले आमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. दरम्यान, बिरेवाडीचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक हे या प्रकरणात दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप गळंगे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मांडवे बुद्रुक हद्दीत संतोष गळंगे यांच्या घरापासून अवघ्या ५० फुटांवर एक अनधिकृत पोल्ट्री आहे. तसेच बिरेवाडी हद्दीत घरापासून ३०० फुटांच्या अंतरावर अन्य दोन पोल्ट्री आहेत. या पोल्ट्रीमुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, येथील एन.ओ.सी. (नाहरकत प्रमाणपत्र) रद्द करून त्या सीलबंद कराव्यात, अशी मागणी गळंगे यांनी केली आहे. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
पोलीस प्रशासनाची मध्यस्थी निष्फळ
उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी, १५ ऑगस्ट रोजी घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी मांडवे बुद्रुकचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकही उपस्थित होते. या सर्वांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली, मात्र पोल्ट्रीवर कारवाई करण्याबाबत कोणताही ठोस तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय गळंगे यांनी घेतला.
प्रकृतीबाबत चिंता
रविवार १६ ऑगस्ट रोजी उपोषणाचा तिसरा दिवस असून, सलग तीन दिवस अन्नत्याग केल्याने संतोष गळंगे यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. उपोषणकर्त्याच्या प्रकृतीला काही इजा झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
आता या प्रकरणात वरिष्ठ प्रशासन हस्तक्षेप करून कायदेशीर कारवाई करणार की गळंगे यांचे उपोषण लांबणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
‘एक भाऊ सीमेवर, तर दुसरा न्याय मागण्यासाठी उपोषणावर’
विशेष म्हणजे, उपोषणकर्ते संतोष गळंगे यांचे बंधू साहेबराव गळंगे हे भारतीय सैन्य दलात देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत आहेत. कुटुंबातील एक सदस्य देशाचे रक्षण करत असताना, दुसऱ्या सदस्याला आपल्या हक्कासाठी आणि आरोग्यासाठी स्वतःच्या गावातच प्रशासनाविरुद्ध उपोषण करावे लागत असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.