भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आश्वी बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेच्या आश्वी इंग्लिश स्कूलमध्ये एका स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीतून सुमारे अडीच लाख रुपये किमतीचा अत्याधुनिक वॉटर प्युरिफायर प्लांट शाळेला भेट दिला असून, यामुळे विद्यार्थ्यांना आता स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे.
माजी विद्यार्थी राहुल सूर्यकांत भंडारी, रोहित सूर्यकांत भंडारी व रविंद्र सूर्यकांत भंडारी यांनी आपले वडील स्वर्गीय सूर्यकांत देवीचंद भंडारी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा प्रकल्प राबविला आहे. ताशी ५०० लिटर पाणी शुद्ध करण्याची क्षमता असलेल्या या प्लांटचे लोकार्पण इंदुमती भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे, केवळ प्लांट बसवून न थांबता त्याच्या ‘लाईफटाईम मेंटेनन्स’चा (कायमस्वरूपी देखभाल) खर्चही भंडारी बंधूंनी स्वीकारला आहे.
विद्यालयाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पलंगांची आवश्यकता असल्याचे आवाहन प्राचार्य दीपक चव्हाण यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य सुमतीलाल गांधी यांनी पलंगांसाठी १० हजार रुपयांची देणगी देऊन मदतीचा हात पुढे केला.
या प्रसंगी सरपंच नामदेव शिंदे, उपसरपंच बाळासाहेब मदने, ज्येष्ठ पत्रकार सीताराम चांडे, वैभव ताजणे, अनिल शेळके, योगेश रातडीया, नेमीचंद भंडारी, प्रशांत गांधी, सुभाष म्हसे, गणेश गायकवाड, सतीश होडगर, संतोष ताजणे, सुशील भंडारी, राजेंद्र शहाणे, बेबीताई भंडारी, सचिन उंबरकर, आप्पाजी मुळे, जयदीप सांगळे यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.