संगमनेर नगरपालिका येथे आज १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त नगराध्यक्षा डॉ. मैथिली सत्यजीत तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त संगमनेर शहरातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देताना डॉ. मैथिली तांबे म्हणाल्या की, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी मोठा संघर्ष केला आणि आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या त्यागामुळेच आज आपण स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाने जीवन जगत आहोत. त्यामुळे स्वातंत्र्य दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नसून, स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आठवण करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याचा दिवस आहे.
आजच्या दिवशी आपण आपापसांतील मतभेद बाजूला ठेवून देशाच्या प्रगतीसाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प केला पाहिजे. स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या योगदानातून प्रेरणा घेत भारताच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहनही नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी केले.