राहुरी । झुंझार न्यूज

 

 गेल्या अनेक महिन्यांपासून दुरवस्था आणि रखडलेल्या कामामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या नगर–मनमाड महामार्गाच्या कामाला आता गती मिळणार असून, येत्या डिसेंबरअखेरपर्यंत नागरिकांची या त्रासातून सुटका होईल, असा महत्त्वपूर्ण दावा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला आहे. राहुरी येथे आयोजित ‘तिरंगा रॅली’ दरम्यान त्यांनी ही ग्वाही दिली.

 

भव्य तिरंगा रॅलीने दुमदुमली देवळाली प्रवरा


स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्वतः मोटारसायकल चालवत सहभाग नोंदवला. हातात तिरंगा घेऊन निघालेल्या या रॅलीने संपूर्ण परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण केले होते. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी या रॅलीत मोठी गर्दी केली होती.

महामार्गाच्या प्रश्नावर डॉ. विखेंची रोखठोक भूमिका
यावेळी माध्यमांशी बोलताना डॉ. विखे पाटील यांनी नगर–मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामावर भाष्य केले. रस्त्यावरील धुळीचे साम्राज्य, जीवघेणे खड्डे आणि सतत होणारी वाहतूक कोंडी यामुळे जनता संतप्त आहे. यावर बोलताना विखे पाटील म्हणाले, “महामार्गाच्या कामात काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, केवळ सोशल मीडियावर पोस्ट टाकून किंवा आंदोलनांचे स्टंट करून रस्ते होत नसतात. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा आवश्यक असतो, जो आम्ही सातत्याने करत आहोत.”

युद्धजन्य परिस्थितीचा फटका आणि ‘डिसेंबर’ची डेडलाईन
रस्त्याच्या कामात होत असलेल्या विलंबाचे कारण स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे डांबराच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आहे, ज्याचा फटका अनेक विकासकामांना बसला. मात्र, आता हे अडथळे दूर होत असून डिसेंबरपर्यंत या महामार्गाचे काम बऱ्यापैकी पूर्ण होईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल. यावेळी त्यांनी स्वभावाप्रमाणे मिश्कील टिप्पणी करताना म्हटले, “मी मेंदूचा डॉक्टर आहे; पण राजकारणात आल्यावर माझाच मेंदू खराब झाला की काय, असे वाटू लागले आहे,” अशा शब्दांत त्यांनी राजकीय परिस्थितीवर चिमटा काढला.

खासदार निलेश लंकेंना ‘रॉ’चे अध्यक्ष करा; सिस्पे प्रकरणावरून टोला


यावेळी डॉ. सुजय विखे पाटील यांनी खासदार निलेश लंके यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. सिस्पे प्रकरणातील आरोपींना आपल्या कार्यकर्त्यांनी शोधून काढल्याचा दावा लंके यांनी केला होता. यावर उपरोधिक टीका करताना डॉ. विखे म्हणाले, “डॉनला पकडणे कठीणच नाही तर असंभव होते, असे आपण ऐकले आहे. मात्र, ही ‘नामूमकिन’ गोष्ट जर खासदारांनी करून दाखवली असेल, तर त्यांना नक्कीच देशाच्या ‘रॉ’ (RAW) या गुप्तचर संघटनेचे अध्यक्ष करायला हवे.” या विधानामुळे राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चेला उधाण आले आहे.

नगर–मनमाड महामार्गाच्या कामाबाबत डॉ. विखे पाटील यांनी दिलेल्या डिसेंबरच्या डेडलाईनमुळे आता या मार्गावरील प्रवाशांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात कामाला कधी गती मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *