५.६८ लाखांचा तंबाखू आणि ५ लाखांची कार पोलिसांच्या ताब्यात; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
झरेकाठी । झुंझार न्यूज
शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची अवैध विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घोडेगाव येथे मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ५ लाख ६८ हजार ५१० रुपयांचा तंबाखू आणि ५ लाख रुपये किमतीची कार असा एकूण १० लाख ६८ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र, या कारवाईनंतर परिसरात रंगलेल्या ‘सेटलमेंट’च्या चर्चेने पोलीस दलात आणि नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.५० वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर मार्गावरील घोडेगाव येथील ‘दर्शन किराणा दुकान’ परिसरात ही कारवाई करण्यात आली. संशयास्पद हालचाली जाणवल्याने पोलिसांनी एमएच ३२ एवाय ०२६१ क्रमांकाच्या कारची झडती घेतली असता, त्यात सुगंधित तंबाखू व विविध प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा आढळून आला.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक राहुल डोके यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार यश मनोज नहार (रा. घोडेगाव) आणि अजित हनुमंत पवार (रा. कुसळम, ता. पाटोदा) या दोघांविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५ व ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर जाधव करत आहेत.
कारवाई कौतुकास्पद, पण पुढची साखळी कुठे?
पोलिसांनी १० लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याने त्यांचे कौतुक होत असले, तरी या तंबाखू विक्रीचे जाळे नेमके कुठपर्यंत पसरले आहे, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. जप्त केलेला माल कोणाला दिला जाणार होता? यातील मुख्य पुरवठादार कोण? केवळ दोन आरोपींवर गुन्हा दाखल करून ही साखळी तुटणार का? असे प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत.
‘सेटलमेंट’च्या चर्चेने संशयाचे धुके
स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाया नेहमीच चर्चेत असतात. घोडेगाव येथील कारवाईनंतर “कारवाईपेक्षा तडजोडीला अधिक महत्त्व दिले जाते का?” अशी उलटसुलट चर्चा परिसरात सुरू झाली आहे. मोठा साठा मिळूनही तपासाची दिशा संथ असल्याचे बोलले जात असून, पोलिसांनी या प्रकरणातील संपूर्ण साखळी उघड करून पारदर्शक माहिती द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
![]()
प्रतिबंधित तंबाखूचा साठा जप्त करणे चांगलेच आहे, मात्र पोलिसांनी केवळ वरवरची कारवाई न करता यातील मुख्य सूत्रधार आणि वितरक यांची निष्पक्ष चौकशी करावी. ‘सेटलमेंट’च्या चर्चांमुळे पोलिसांच्या प्रतिमेला तडा जात आहे, त्यामुळे प्रशासनाने वस्तुस्थिती समोर आणावी.”



