{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

प्रशासनाकडून तातडीने दखल; आशिष शेळके यांच्या पाठपुराव्यामुळे वाहनधारकांना दिलासा

आश्वी । झुंझार न्यूज

आश्वी ते उंबरी बाळापूर या दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्याची झालेली दयनीय अवस्था आणि खचलेल्या साईड पट्ट्यांमुळे वाढलेले अपघातांचे प्रमाण, याकडे रिपब्लिकन पक्षाने लक्ष वेधल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. रिपब्लिकन पक्षाचे संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी केलेल्या मागणीची आणि दैनिक पुढारीतून प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत, सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या साईड पट्ट्या (कपारी) भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.

आश्वी बुद्रुक हे परिसरातील मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. कनोली, मनोली, ओझर, कनकापूर, शेडगांव या ग्रामीण भागातील शेतकरी, दूध उत्पादक आणि शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची या रस्त्यावरून मोठी वर्दळ असते. हा रस्ता जोर्वे मार्गे थेट संगमनेरला जोडत असल्याने तो आश्वी परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या कपारी पडल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता.


रस्ता मुळातच अरुंद असल्याने समोरून मोठे वाहन आल्यास दुचाकीस्वारांना आपली वाहने खाली उतरावी लागतात. अशा वेळी साईड पट्ट्या खचलेल्या असल्याने अनेकांचे ताबा सुटून अपघात झाले आहेत. यात अनेक प्रवासी जखमी झाले असून वाहनांचेही नुकसान झाले होते. या संदर्भात आशिष शेळके यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाकडे तातडीने दुरुस्तीची मागणी केली होती.

या गंभीर प्रश्नाबाबत आशिष शेळके यांनी राज्याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (राहाता) चे काशिनाथ गुंजाळ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून रस्त्याची विदारक स्थिती मांडली होती. दैनिक ‘पुढारी’मध्ये या संदर्भात बातमी प्रसिद्ध होताच दुसऱ्याच दिवशी प्रशासनाने हालचाली करत मुरूम टाकून साईड पट्ट्या भरण्याचे काम सुरू केले. या तत्परतेबद्दल आशिष शेळके यांनी मंत्री विखे पाटील व बांधकाम विभागाचे आभार मानले आहेत.

आश्वी-उंबरी बाळापूर रस्त्यावरील वाढती वाहतूक पाहता केवळ साईड पट्ट्या भरून प्रश्न कायमस्वरूपी सुटणार नाही. सध्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासनाने तातडीने काम सुरू केले ही समाधानाची बाब असली, तरी भविष्यातील गरज ओळखून या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करावे, ही आमची प्रमुख मागणी कायम आहे.

आशिष शेळके (तालुकाध्यक्ष, रिपब्लिकन पक्ष, संगमनेर)

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *