मनोहर महाराज सिनारे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता , तरुणाईसह हजारो भाविकांची उपस्थिती
आश्वी । झुंझार न्यूज
संतपरंपरेचा दैदिप्यमान वारसा, विठ्ठलभक्तीची पताका आणि हरिनामाचा अखंड जागर… अशा अत्यंत चैतन्यमय आणि भक्तिमय वातावरणात राहुरी तालुक्यातील सोनगाव येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ४१ वा अखंड हरिनाम सप्ताह नुकताच उत्साहात संपन्न झाला. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या या सोहळ्याची सांगता भागवताचार्य ह.भ.प. मनोहर महाराज सिनारे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. यावेळी ‘विठ्ठल-विठ्ठल’च्या नामघोषाने संपूर्ण सोनगाव परिसर दुमदुमून गेला होता.
दिनांक ४ ते ११ ऑगस्ट या कालावधीत आयोजित या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अखंड हरिनाम जप, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, संगीतमय श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ, काकडा आरती, विष्णुसहस्रनाम, गाथा भजन, हरिपाठ आणि हरिजागर अशा उपक्रमांनी गावकरी मंत्रमुग्ध झाले. सप्ताहादरम्यान भागवत महात्म्यापासून ते श्रीकृष्ण जन्मोत्सव, रासलीला आणि रुक्मिणी स्वयंवर अशा पौराणिक प्रसंगांचे भावस्पर्शी निरूपण करण्यात आले, ज्यामुळे सोनगावचे वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले होते.
या सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे गावातील तरुणांचा सक्रिय सहभाग. संतपरंपरेचा वारसा केवळ ज्येष्ठांपुरता मर्यादित न ठेवता, तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी गावातील तरुण कार्यकर्त्यांनी आयोजनाची संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. सूक्ष्म नियोजन, पाहुण्यांचे स्वागत आणि व्यवस्थापन यामध्ये तरुणाईने दाखवलेल्या उत्साहामुळे सप्ताहाला एक नवे चैतन्य लाभले.
सप्ताहाचा प्रारंभ १ ऑगस्ट रोजी ह.भ.प. दत्तगिरीजी महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाला. १० ऑगस्ट रोजी ग्रंथराज ज्ञानेश्वरीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. टाळ-मृदुंगाचा गजर आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे ही मिरवणूक भक्तीचा अनोखा सोहळा ठरली.
सप्ताहाच्या सांगतेच्या दिवशी ह.भ.प. मनोहर महाराज सिनारे यांनी आपल्या रसाळ वाणीतून “संत सावता महाराजांनी आपल्या कर्मशक्तीतूनच ईश्वराची भक्ती केली, त्यांचा हाच आदर्श आजच्या पिढीने घ्यावा,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कीर्तनानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
हा सोहळा वै. ह.भ.प. नारायण महाराज रांधवने यांच्या कृपाशीर्वादाने व वै. ह.भ.प. तुळशीराम भाऊ अंत्रे यांच्या प्रेरणेने पार पडला. श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर समिती, भजनी मंडळ आणि समस्त ग्रामस्थांनी या सोहळ्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. संतविचारांचा हा जागर पुढील वर्षी अधिक व्यापक स्तरावर साजरा करण्याचा संकल्प तरुण कार्यकर्त्यांनी यावेळी सोडला.