लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सात्रळ येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ अंतर्गत ‘स्वच्छता वारी, गाव स्वच्छता अभियान’ श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे मोठ्या उत्साहात राबविण्यात आले. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश देत परिसर चकाचक केला.
‘प्रती पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे नुकताच श्री पांडुरंग महोत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला. या महोत्सवासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुमारे १० लाख विठ्ठलभक्तांनी हजेरी लावली होती. यात्रेच्या सांगतेनंतर मंदिर परिसर आणि गावात मोठ्या प्रमाणावर घनकचरा साचला होता. ही बाब लक्षात घेऊन सात्रळ महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी सामाजिक जबाबदारीचे भान राखत या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सकाळपासूनच मंदिर परिसर, मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी श्रमदान केले. साचलेला प्लास्टिक कचरा आणि अन्य घनकचरा गोळा करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली. केवळ स्वच्छता करून न थांबता विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि ‘स्वच्छ व निरोगी गाव’ संकल्पनेवर जनजागृती केली. विद्यार्थ्यांच्या या कार्याचे ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले.
या मोहिमेप्रसंगी श्री संत कवी महिपती महाराज देवस्थानचे मठाधिपती ह.भ.प. अर्जुन महाराज तनपुरे, देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र साबळे, सरपंच निवृत्ती घनदाट आणि देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. मठाधिपतींनी विद्यार्थ्यांच्या या सेवाभावी वृत्तीचा गौरव केला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपानराव शिंगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. उपप्राचार्य डॉ. जयश्री सिनगर, समन्वयक प्रा. आर. डी. बोरसे, डॉ. बी. एन. नवले, प्रा. डी. एन. घाणे, अधीक्षक राजेंद्र गव्हाणे यांचे सहकार्य लाभले. मोहीम यशस्वी करण्यासाठी एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. संदीप राजभोज, प्रा. प्रतिभा विखे, डॉ. विजय शिंदे, सौ. वरपे, डॉ. ई. एस. निर्मळ व श्री. कवडे यांनी विशेष परिश्रम घेतले.