कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते तर धुळे उपविजेते

जगाबरोबर भारतातही फुटबॉल लोकप्रिय होतोय– माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात

वेगाचा खेळ असलेला फुटबॉल जगात लोकप्रिय–माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात

 

 

संगमनेर (प्रतिनिधी)–सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाने अल्पावधीतच गुणवत्तेमधून आपला लौकिक निर्माण केला आहे. जगामध्ये लोकप्रिय असलेल्या फुटबॉलची भारतातही लोकप्रियता वाढत असून संगमनेर मध्ये कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय साईचे फुटबॉल मैदान निर्माण करण्यात आले असून हा खेळ वेगाचा असल्याचे प्रतिपादन माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. तर 22 संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर संघाने विजेतेपद तर धुळे शासकीय कृषी महाविद्यालयाने उपविजेतेपद पटकावले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या अंतर्गत व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय आणि अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंतर महाविद्यालय फुटबॉल स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघ, विद्यापीठाचे माजी क्रीडा अधिकारी प्रा  डी.एम गायकवाड, शासकीय महाविद्यालय पुण्याचे प्रा. अभिजीत नलावडे कोल्हापूर महाविद्यालयाचे प्रा. बोरसे ,धुळे शासकीय महाविद्यालयाचे प्रा.संजय देवरे, कृषी व्यवस्थापन महाविद्यालय लोणीचे प्रा वरखडकर, के के वाघ कृषी महाविद्यालयाचे प्रा. निरगुडे क्रीडा समन्वयक डॉ. व्हि.डी वाळे, प्रा. जी.बी बाचकर , नामदेव गायकवाड, जगन्नाथ गोडगे श्री मडके उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये अहिल्यानगर कोल्हापूर पुणे सातारा सांगली धुळे नाशिक जळगाव या जिल्ह्यांमधील 22 संघांनी सहभाग घेतला. यामधून राजश्री छत्रपती शाहू महाराज कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर कोल्हापूर यांनी 2026 चे विजेतेपद पटकावले. तर शासकीय कृषी महाविद्यालय धुळे उपविजेते ठरले. कृषी व्यवस्थापन महाविद्यालय लोणी यांनी तृतीय क्रमांक मिळवला तर के के वाघ कृषी महाविद्यालय नाशिक यांनी चतुर्थ क्रमांक मिळवला. सर्व विजेत्यांना ट्रॉफी सन्मानचिन्ह व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना मा. कृषिमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, आपल्या सहा वर्षाच्या कृषिमंत्री पदाच्या काळामध्ये सातत्याने विद्यापीठांच्या संपर्कात राहून विद्यापीठांचे ज्ञान जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याकरता कार्यक्रम राबविला. यावेळी केंद्रामध्ये ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार कृषिमंत्री होते व आपण राज्यात जबाबदारी सांभाळली. याचबरोबर कृषी महाविद्यालयाच्या व विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता राखण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले. सध्या विद्यापीठांमध्ये अनेक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जागा रिक्त असून याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे याचबरोबर गुणवत्ता वाढ व दर्जा टिकवण्यासाठी अधिक जबाबदारी घेतली पाहिजे.

गुणवत्ता, संशोधनाबरोबर क्रीडा क्षेत्राला ही महत्त्व मोठे आहे यामधूनही करिअरच्या अनेक संधी आहेत. फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ असून अत्यंत वेगवान खेळ आहे. नुकत्याच झालेल्या फिफा वर्ल्ड कप मध्ये निवेदित संघांमधील खेळाडूंनी अत्यंत चांगली कामगिरी केली संगमनेर मध्ये ही या खेळायला प्रोत्साहन मिळावी याकरता कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आंतरराष्ट्रीय साईजचे मैदान करण्यात आले आहे. या मैदानावर जास्तीत जास्त खेळाडूंनी खेळावे हा उद्देश असून थोरात कृषी महाविद्यालयाने अल्पावधीतच आपला लौकिक निर्माण केला असल्याचे ते म्हणाले

तर प्रा गायकवाड म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या कृषिमंत्री पदाच्या कार्यकाळात महाराष्ट्रात सर्वाधिक कृषी उत्पादन झाले. एक लाख शेततळ्यांची निर्मिती ,महापीक अभियान असे विविध उपक्रम त्यांनी राबवले. तर विद्यापीठांच्या विकासाकरता त्यांनी सातत्याने काम केले विविध उपक्रम राबवले. विद्यापीठ आणि शेतकरी यांचा समन्वय साधला गेला थोरात कृषी महाविद्यालयाने अत्यंत चांगल्या सुविधा खेळाडूंना पुरवल्या असल्याचे ते म्हणाले.

या कार्यक्रमाची प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर राजेंद्र वाघ यांनी केले सूत्रसंचालन प्रा. श्वेता संपतराव कडू यांनी केले तर नामदेव कहांडळ यांनी आभार मानले. यावेळी विविध संघांचे प्रशिक्षण खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्व खेळाडू प्रशिक्षकांना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.

अमृतवाहिनीच्या आदरतिथ्याने खेळाडू भारावले

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अमृतवाहिनी शिक्षण संस्थेचा परिसर हा अत्यंत स्वच्छ व हिरवाईने नटलेला आहे. शिस्तप्रिय वातावरण, अत्याधुनिक सर्व सुविधा, बाबूचे आकर्षक स्वागत गीत, भव्य मैदान आणि होस्टेल मधून सर्व विद्यार्थ्यांना आणि खेळाडूंना जेवणासह पुरवण्यात आलेल्या अत्याधुनिक सुविधा या पुणे मुंबई पेक्षा अधिक चांगले असल्याचे खेळाडू व प्रशिक्षकांनी म्हटले असून सर्व विद्यार्थी व खेळाडूंनी अमृतवाहिनीच्या या स्वागत आणि भारावले असल्याचे म्हटले. यावेळी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करून संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *