आकाश दुबैय्या हत्या प्रकरणी  मुख्य आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती न लागल्याने दुबैय्या कुटुंबीयांचे उपोषण सुरू !

 

 

झरेकाठी । झुंझार न्यूज 

 


श्रीरामपूर येथील युवा उद्योजक आकाश दुबैय्या यांची हत्या होणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत. जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक प्रभावीपणे ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवावे, अशा कडक सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

श्रीरामपूर येथील युवा उद्योजक आकाश दुबैय्या यांची महिनाभरापूर्वी हत्या झाली होती. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती न लागल्याने दुबैय्या कुटुंबीयांनी गेल्या दोन दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर, ना. विखे पाटील यांनी आज उपोषणस्थळी जाऊन कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना विखे पाटील म्हणाले की, “या घटनेबाबत कुटुंबीय आणि जनतेमध्ये मोठी चीड आहे. तपासाची गोपनीयता पाळून पोलीस काम करत आहेत. तपास प्रक्रियेबाबत लोकांमध्ये कोणताही गैरसमज राहू नये, यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी तपासाच्या प्रगतीबाबत माध्यमांना अधिकृत माहिती द्यावी, असे निर्देश मी दिले आहेत.”

अमली पदार्थांच्या तस्करांवर कडक कारवाईचे संकेत
जिल्ह्यात सध्या अमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. यावर भाष्य करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, “श्रीरामपूरमधील महाविद्यालयांमध्ये अमली पदार्थ विक्रीचे रॅकेट उघड झाले असणे ही बाब अतिशय गंभीर आहे. हे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित करावे. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.”

जिल्ह्यातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील असले तरी, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोम्बिंग ऑपरेशन अधिक तीव्रतेने राबवण्याचे आदेश त्यांनी यावेळी जिल्हा पोलीस प्रशासनाला दिले. मंत्र्यांच्या या भेटीनंतर आणि आश्वासनानंतर आता पोलीस तपासाला किती वेग येतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *