मुंबई । झुंजार न्यूज
शिर्डी लोकसभा मतदार संघातून 2009 साली रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे पराभूत झाले होते. मात्र, 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी आणि सोलापुरच्या जागेची मागणी आठवलेंकडून महायुतीकडे करण्यात आली होती. पण, ही जागा महायुतीत शिवसेनेकडे असल्यानं सदाशिव लोखंडे यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. यातच आता शिर्डी लोकसभा मतदार संघावरून रामदास आठवलेंनी भाजपचे नेते, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर थेट आरोप केला आहे.

“शिर्डी लोकसभा लढविण्यासाठी मी प्रयत्न करत होतो. माझ्या राज्यसभेची मुदत 2026 पर्यंत आहे. पण, माझा चेहरा लोकसभेचा असल्यानं निवडून जावं, असं मला वाटत होतं. मात्र, शिर्डीची जागा मला मिळाली नाही. राधाकृष्ण विखे-पाटलांनी मला शिर्डीतून तिकीट मिळू नये, यासाठी पत्र लिहिलं होतं,” असा गौप्यस्फोट आठवलेंनी यांनी एका मुलाखतीत केला आहे.

“पंढरपूरमधून दोनवेळा लोकसभेला”
रामदास आठवले म्हणाले, “2009 मध्ये शिर्डीतून मी पराभूत झालो नव्हतो, तर पाडण्यात आलं होतं. पराभूत होणं हे आयुष्यात मला कधी माहिती नव्हतं. उत्तर मध्य मुंबईत शिवसेनेचा गड असतानाही काँग्रेसच्या आघाडीत मी निवडून आलो होतो. त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीत पंढरपूरमधून दोनवेळा लोकसभेला निवडून गेलो.”

“विखे-पाटलांच्या कुटुंबानं माझ्या विरोधात प्रचार केला”
“बाळासाहेब विखे-पाटील यांचा आग्रह होता की मी शिर्डीतून निवडणूक लढवली पाहिजे. तर, नगर लोकसभा मतदार संघातून बाळासाहेब विखे-पाटलांना उभे राहायचं होतं. पण “राष्ट्रवादीनं ती जागा बाळासाहेब विखे-पाटलांना दिली नाही. त्यामुळे 2009 मध्ये विखे-पाटलांच्या कुटुंबानं माझ्या विरोधात प्रचार केला. मात्र, शरद पवारांना मानणाऱ्या वर्गाकडून सुद्धा आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही. शरद पवार प्रामाणिक होते, त्यांनी माझा प्रचार केला. मात्र, स्थानिक पातळीवर माझ्याविरोधात वातावरण तयार करून पराभव करण्यात आला,” असं आठवलेंनी सांगितलं.

“शिर्डीतून उमेदवारी मिळण्यासाठी गेली दोन-तीन वर्षे झालं प्रयत्न करत होतो. राधाकृष्ण विखे आणि मधुकर पिचड यांच्याशी याबद्दल बोलणं झालं होतं. माझ्या राज्यसभेची मुदत 2026 पर्यंत आहे. पण, माझा चेहरा लोकसभेचा असल्यानं निवडून जावं, असं वाटत होतं. मात्र, शिर्डीची जागा मला मिळाली नाही. राधाकृष्ण विखेंनी मला शिर्डीतून तिकीट मिळू नये, यासाठी पत्र लिहिलं होतं. वास्तविक विखेंना निवडून आणण्यात रिपाइंचा मोठा वाटा आहे. पण, विखेंनी का असं केलं माहिती नाही,” अशी खंत आठवलेंनी बोलून दाखवली.

गुरुवार दि ११ एप्रिल २०२४ रोजी शिर्डी व दक्षिण नगर लोकसभा निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे कार्यकर्त्याची बैठक होणार असल्याने हजारों कार्यकर्ते मुंबईला जाणार असल्याची माहिती मिळाली .
