एकविरा फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षेसाठीची मोफत लायब्ररी सुरू
यशोधन कार्यालयात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे पुस्तके उपलब्ध
संगमनेर । झुंजार न्यूज
कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील तरुण व तरुणींना स्पर्धा परीक्षा साठी मोफत अद्यावत लायब्ररी सुरू करण्यात आली असून या लायब्ररीमुळे तालुक्यातील तरुणांना मोठी संधी उपलब्ध झाली असल्याचे प्रतिपादन मा. शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

यशोधन जनसंपर्क कार्यालय येथे एकविरा फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लायब्ररीचा शुभारंभ आमदार थोरात यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. जयश्रीताई थोरात, प्रा. डॉ. वृषाली साबळे, श्रीराम कुऱ्हे, सुरभी मोरे, सुरभी असोपा, प्रा. बाबा खरात, नामदेव कहांडळ,विजय वाकचौरे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, डॉ जयश्रीताई थोरात यांनी युथ कनेक्ट या संवादाच्या कार्यक्रमात संगमनेर तालुका व शहरातील सुमारे चार हजार तरुणांशी संवाद साधला .यावेळी अनेक युवकांनी मध्यवर्ती स्पर्धा परीक्षा ग्रंथालय, अभ्यासिका असावी अशी मागणी केली होती. एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला सबलीकरण व महिलांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहे . एकविरा फाउंडेशनच्या वतीने युवकांसाठी स्पर्धा परीक्षांसाठी ग्रंथालय ही नवी संकल्पना राबवली जात आहे. ही सुरुवात असून यापुढेही या विभागात एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून आणखी काम केले जाणार आहे. या स्पर्धा परीक्षा ग्रंथालयामुळे तरुणांकरता ही मोठी संधी निर्माण झाली असून जास्तीत जास्त विद्यार्थी व विद्यार्थिनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

तर कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हे मोठे शैक्षणिक केंद्र झाले आहे. उच्च शिक्षणामुळे अनेक विद्यार्थी चांगल्या पदावर कार्यरत आहेत. स्पर्धा परीक्षेची व इतर विविध सरकारी नोकरीच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगली सुविधा निर्माण करून देण्याबरोबरच त्यांना विविध पुस्तके एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी ही लायब्ररी सुरू केली आहे. यामध्ये सरकारी नोकरी, सह स्पर्धा परीक्षांची तयारी तसेच मेडिकल परीक्षेच्या तयारीचे ही अनेक पुस्तके उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी या सर्व पुस्तकांचा लाभ घ्यावा असे आवाहन ही त्यांनी केले आहे

यशोधन कार्यालयात या लायब्ररीचा स्वतंत्र कक्ष असून सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 5 या वेळेत विद्यार्थ्यांना आपल्या आयकार्ड वर ही पुस्तके मोफत मिळणार आहेत.
चौकट
या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना होणार फायदा
एकविरा च्या वतीने सुरू झालेल्या ग्रंथालयात तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती, एमपीएससी, युपीएससी, नेट, सेट, बँकिंग भरती, मेडिकल, इंजीनियरिंग सीईटी, नीट यांसह विविध परीक्षांसाठीच्या सुमारे 1200 पुस्तके उपलब्ध असून सकाळी 9 ते 5 या वेळेत यशोधन कार्यालयात विद्यार्थ्यांना ते उपलब्ध होणार आहेत.
