जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध
संगमनेर । झुंजार न्यूज
शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असताना वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीला अतिक्रमणे कारणीभूत ठरली आहेत. झालेली अतिक्रमणे हटवण्याची नागरिकांची मागणी असताना त्या संदर्भाने नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम आणि पोलीस प्रशासनाची एकत्रित बैठक घेतली होती. त्यानुसार प्रशासनाने एकत्रित येऊन अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेतली आहे. संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.

वाहतुकीला अडथळा ठरणारी सर्वच अतिक्रमणे काढण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी असताना शासकीय विश्रामगृहावर त्या संदर्भाने संगमनेर नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. अतिक्रमण आणि वाहतूक कोंडी या संदर्भाने नागरिकांनी दिलेली माहिती लक्षात घेता. ज्या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होते, काही ठिकाणी छोटे-मोठे अपघात यापूर्वी घडले आहेत. भविष्यात असे अपघात होऊ नयेत आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा मार्गी लागावा. याकरिता बैठकीत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना अतिक्रमण काढण्या संदर्भाने सुचित केले होते. त्यानुसार ही कारवाई सुरू आहे.

१४ जानेवारीपासून प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम सुरू करण्याच्या एक दिवस अगोदरही बैठक पार पडली. नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वतीने शहर हद्दीत सुमारे २५० हून अधिक अतिक्रमण धारकांना नोटीसा पाठविण्यात आल्या होत्या. त्यानुसार ही कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
__
शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनली आहे. अशातच अतिक्रमणांचा प्रश्न समोर असल्याने दिवसभरात अनेक ठिकाणी अनेकदा वाहतूक कोंडी होते. अतिक्रमणांमुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याच्या संदर्भाने नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. त्याबाबतही बैठक घेणार आहोत. जेणेकरून वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल. असेही आमदार अमोल खताळ-पाटील यांनी सांगितले.
