अकोले । झुंझार न्यूज
संगमनेर आणि पारनेर तालुक्यात लोककलावंतांवर झालेल्या भ्याड हल्ल्यांच्या निषेधार्थ आणि कलावंतांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ‘लोककलावंत सांस्कृतिक विचार मंच महाराष्ट्र राज्य’ या संघटनेच्या वतीने भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता अकोले येथील तहसीलदार, प्रांत अधिकारी आणि डीवायएसपी यांना ५०० हून अधिक कलावंतांच्या उपस्थितीत मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांत ग्रामीण भागात कला सादरीकरण करणाऱ्या कलावंतांवर जीवघेणे हल्ले होण्याच्या घटना घडल्या आहेत. महाराष्ट्राची संस्कृती जपणाऱ्या या कलावंतांवर होणारे हे अन्याय आता सहन केले जाणार नाहीत, असा पवित्रा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गवनेरजी सरोदे यांनी घेतला आहे. “कला ही आनंदासाठी असते, पण काही व्यसनाधीन तरुण कलावंतांना विनाकारण त्रास देतात. यामुळे ग्रामीण भागातील कलावंत खचला असून, पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी फिरणाऱ्या कलावंतांना आता पोलीस संरक्षणाची गरज आहे,” असे सरोदे यांनी निवेदनात म्हटले आहे.

ग्रामीण कलावंतांच्या उपेक्षेचा प्रश्न ऐरणीवर
शासकीय योजनांचा लाभ घेताना नेहमीच ग्रामीण कलावंतांना डावलले जाते आणि केवळ ठराविक किंवा मोठ्या कलावंतांनाच निधी दिला जातो, असा आरोपही संघटनेने केला आहे. तळागाळातील उत्कृष्ट कलावंतांना संधी मिळावी आणि त्यांच्या कलेची दखल घेतली जावी, ही या आंदोलनाची प्रमुख भूमिका आहे.

शासनाकडे करण्यात आलेल्या ११ प्रमुख मागण्या:
१) कार्यक्रम स्थळी कलावंतांना कायमस्वरूपी पोलीस संरक्षण मिळावे.
२) राजर्षी शाहू महाराज मानधन योजनेचा कोटा प्रत्येक जिल्ह्यासाठी १०० वरून ५०० करण्यात यावा.
३) कलावंतांचा २० लाख रुपयांपर्यंतचा विमा शासनाने मोफत उतरवावा.
४) कलावंतांना एसटी आणि रेल्वे प्रवास मोफत असावा.
५) कलावंतांच्या पाल्यांना पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत मिळावे.
६) कलावंतांना १५ लाख रुपयांपर्यंतची आरोग्य सुविधा मोफत मिळावी.
७) तरुण कलावंताचे अकाली निधन झाल्यास त्याच्या वारसाला ५ लाख रुपयांची मदत मिळावी.
८) प्रत्येक तालुक्यात ‘कवी वामनदादा कर्डक’ यांच्या नावाने सांस्कृतिक भवन उभारण्यात यावे.
९) कलावंत असल्याची अधिकृत पडताळणी करून त्यांना तसे प्रमाणपत्र देण्यात यावे.
१०) दूरदर्शन, आकाशवाणी आणि राज्यस्तरीय महोत्सवांत ग्रामीण कलावंतांना सक्रिय संधी मिळावी.
११) २०२४ च्या मानधन यादीत झालेल्या त्रुटी दूर करून वंचित कलावंतांची निवड व्हावी.

या आंदोलनात वाजंत्री, तमाशा कलावंत, आदिवासी नृत्य, जागरण-गोंधळ आणि पारंपरिक कला प्रकारातील ५०० हून अधिक कलावंत सहभागी होणार आहेत. यामध्ये कुंदा सुरेखा पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळाच्या मालकीण कुंदा पुणेकर, विठाबाई भाऊ नारायणगावकर तमाशा मंडळाचे बाळाभाऊ सावंत, दत्ता महाडिक पुणेकर तमाशा मंडळाचे मालक संजय महाडिक आणि विनायक महाडिक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.



