जुन्नर । झुंझार न्यूज


शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या बोरी खुर्द (ता. जुन्नर) येथे एका विवाह सोहळ्यात ‘न भूतो न भविष्यती’ असा अनोखा सामाजिक आणि ऐतिहासिक उपक्रम राबवण्यात आला. सीबीएससी (CBSE) बोर्डाच्या आठवीच्या अभ्यासक्रमात मराठा साम्राज्याचा नकाशा पूर्ववत करावा, या मागणीसाठी चक्क विवाह मंडपात सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली. या उपक्रमाची सध्या संपूर्ण पुणे जिल्ह्यात आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा होत आहे.

लग्नाचे निमित्त, ध्येय इतिहासाचे:


बोरी खुर्द येथील शेतकरी कुटुंबातील श्री. दिनकर गोविंद लोहकरे यांची सुकन्या चि.सौ.कां. अक्षदा आणि बिद्रेवाडी (ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) येथील श्री. प्रकाश जोतिबा टक्केकर यांचे सुपुत्र चि. अनिकेत यांचा शुभविवाह नुकताच संपन्न झाला. आनंदाच्या या क्षणी आपल्या गौरवशाली इतिहासाचे विस्मरण होऊ नये, या उदात्त हेतूने लोहकरे आणि टक्केकर परिवाराने मराठा साम्राज्याच्या नकाशासाठी जनजागृती करण्याचा निर्णय घेतला.

७०० हून अधिक मान्यवरांचा पाठिंबा


या विवाह सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. यावेळी ‘शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य’ संघटनेच्या वतीने राबवण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमात पुणे जिल्हा परिषद सदस्य कल्पनाताई वैभव शेठ काळे, अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुनंदाताई भागवत, पारनेर खरेदी-विक्री संघाचे संचालक कारभारी पाटील आहेर, आळे गावचे उपसरपंच मंगेश कुऱ्हाडे, शिवसेना शाखाप्रमुख माऊली शेठ शेजवळ, भानुदास बस्ते, संभाजी दादा काळे, रामदास शेठ काळे, युवा नेते रोहन शेठ बेल्हेकर, हरीष कोकणे, तुकाराम भागवत यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपल्या सह्या करून या मागणीला पाठिंबा दर्शविला.


याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक/प्रदेशाध्यक्ष राहुल बाजीराव ढेंबरे पाटील म्हणाले की, “अखंड हिंदुस्थानच्या संकट काळात मराठ्यांनी पानिपतच्या भूमीवर अतुलनीय संघर्ष केला. ‘अहद तंजावर ते तहद पेशावर’ आणि ‘अटक ते कटक’ असा मराठा साम्राज्याचा विस्तार होता. हा जिवंत आणि ज्वलंत इतिहास आपल्या पुढच्या पिढीला समजावा, यासाठी सीबीएसईच्या अभ्यासक्रमात मराठा साम्राज्याचा नकाशा असणे अनिवार्य आहे. तो वगळणे किंवा चुकीच्या पद्धतीने मांडणे हा आपल्या पूर्वजांच्या बलिदानाचा अपमान आहे.”

कल्पनाताई काळे आणि सुनंदाताई भागवत यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत, इतिहासाच्या रक्षणासाठी अशा मोहिमा काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शिवप्रतिष्ठाणचे हौशीराम मिंडे, शिवनाथ नाईकवाडी, सुरेश सहाणे, ओमकार गुंजाळ, गणेश श्रीराम, शुभम भागवत, प्रविण लोहकरे, राजेंद्र ढेंबरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. विवाह सोहळ्यासारख्या कौटुंबिक कार्यक्रमाचा वापर सामाजिक जनजागृतीसाठी केल्याबद्दल लोहकरे आणि टक्केकर परिवारावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. लग्नात जमलेल्या ७०० हून अधिक लोकांच्या या सह्या आता संबंधित विभागाकडे पाठवण्यात येणार आहेत.

 


राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *