आश्वी । झुंझार न्यूज
राहुरी तालुक्यातील व प्रवरा परिसरातील सात्रळ येथील ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच रमेश भीमराज पन्हाळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ सोनगाव, सात्रळ आणि धानोरे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सर्वपक्षीय निषेध सभा घेऊन गुंडगिरी आणि अवैध धंद्यांविरोधात एल्गार पुकारला आहे. प्रवरा नदीपात्रातून होणारा बेकायदा वाळू उपसा आणि वाढत्या अवैध धंद्यांमुळेच गावातील गुंडगिरी फोफावली असून, या प्रवृत्तींचा राजकारण विरहित बीमोड करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
गत शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास ५ ते ६ जणांच्या टोळक्याने रमेश पन्हाळे यांना गाठले. जुन्या वादातून त्यांना शिवीगाळ व दमदाटी करत बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर, हल्लेखोरांनी पन्हाळे यांच्या खिशातील २५ हजार ४०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. पन्हाळे यांनी यापूर्वी या गुंडांविरोधात पोलिसांत अदखलपात्र (NC) गुन्हा दाखल केला होता, त्याचाच राग मनात धरून हा हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पंचक्रोशी ग्रुप सोसायटीसमोर आयोजित करण्यात आलेल्या सभेत ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला. प्रवरा शिक्षण संस्थेचे संचालक ॲड. आप्पासाहेब दिघे, प्रतापराव कडू, योगेश चोरमुंगे यांनी आपल्या भाषणातून हल्ल्याचा तीव्र निषेध केला. ॲड. बिपिन ताठे यांनी अवैध दारू विक्री आणि वाळू चोरीच्या विरोधात ग्रामसभेत ठराव मांडण्याचे आवाहन केले, ज्याला किरण कडू यांनी अनुमोदन दिले.

वक्त्यांनी स्पष्ट केले की, गावातील शांतता भंग करणाऱ्या गुंडांना कोणत्याही राजकीय पक्षाने पाठीशी घालू नये. सामूहिक ताकदीने अशा प्रवृत्तींचा नायनाट करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त झाले.

या निषेध सभेला प्रा. बाळासाहेब दिघे, प्रवरा बँकेचे संचालक संतोष अंत्रे, वसंतराव डुकरे, कारभारी ताठे, मच्छिंद्र अंत्रे, नारायण धनवट, ॲड. बाळकृष्ण चोरमुंगे, माजी सरपंच राजेंद्र अनाप, ओम पन्हाळे, पाराजी धनवट, प्रमोद नालकर, योगेश पलघडमल, प्रकाश ताठे, राजेंद्र चोरमुंगे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

पालकमंत्री विखे पाटलांकडून दखल; गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे आदेश
राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी शनिवारी दुपारी रमेश पन्हाळे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. भरवस्तीत लोकप्रतिनिधीवर हल्ला होणे ही गंभीर बाब असल्याचे सांगत, विखे पाटील यांनी पोलिसांना कडक सूचना दिल्या आहेत. गुन्हेगारांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत.


