आश्वी । झुंझार न्यूज

.

गुहा ते शिबलापूर आणि शिबलापूर ते हंगेवाडी या मुख्य रस्त्याची सध्या अत्यंत दुरवस्था झाली असून, प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात आता स्थानिक तरुण आणि ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. वारंवार निवेदने देऊनही रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने, आता गावोगावी सह्यांची मोहीम राबवून प्रशासनाला जागे करण्याचा निर्णय तरुणांनी घेतला आहे.

गुहा ते शिबलापूर या २२ किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर सध्या जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेकदा या रस्त्याची थातूरमातूर डागडुजी करण्यात आली, मात्र ती केवळ वेळकाढूपणा ठरली आहे. सद्यस्थितीत रस्त्याची खडी पूर्णपणे उघडी पडली असून, “रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता” हे ओळखणे प्रवाशांना कठीण झाले आहे. या दुरवस्थेमुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान होत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.


या रस्त्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याचा अर्धा भाग संगमनेर तालुक्यात येतो, तर उर्वरित भाग राहुरी तालुक्यात येतो. या सीमावादामुळे दोन्ही तालुक्यांचे सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “प्रशासकीय दिरंगाई आणि सीमावादामुळे सामान्य जनतेने किती काळ नरकयातना सोसायच्या?” असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

आम्ही अनेकदा लोकशाही मार्गाने निवेदने दिली, पण आमचा आवाज दाबला जात आहे. गुहा ते हंगेवाडी या रस्त्याचे तात्काळ रुंदीकरण आणि डांबरीकरण झाले नाही, तर येणाऱ्या काळात चक्काजाम आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा परिसरातील तरुणांनी व प्रवाशांनी दिला आहे.


आता या सह्यांच्या मोहिमेनंतर तरी सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देणार का? की प्रवाशांना असाच जीव मुठीत धरून प्रवास करावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खड्डे वाचवा’ आंदोलन आणि सह्यांची मोहीम

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी “खड्डे वाचवा आणि बक्षीस मिळवा” अशी उपरोधिक शक्कल लढवून शासनाचा निषेध केला होता. मात्र, तरीही प्रशासनाला जाग न आल्याने आता तरुणांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गावोगावी जाऊन हजारो नागरिकांच्या सह्या गोळा करण्यात येत आहेत. ही मोहीम तीव्र करून लवकरच हे निवेदन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना सोपवण्यात येणार आहे

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *