संगमनेर शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

 

दलित, शोषितांचा आपल्या साहित्यामधून आवाज बुलंद करताना त्यांच्या हक्कांसाठी लढणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी साहित्यातून मोठी क्रांती केली. मानवतेसाठी व समतेसाठी त्यांनी आवाज उठवला. त्यांचे विचार हे सदैव प्रेरणादायी असून लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकारातून संगमनेर शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे अद्यावत स्मारक लवकरात लवकर साकारण्यात येणार असल्याचे मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांनी म्हटले आहे.

संगमनेर हायटेक बसस्थानकासमोर मातंग एकता समाज व सकल मातंग समाजाच्या वतीने 106 व्या जयंती निमित्ताने आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. याचबरोबर लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मातंग एकता आंदोलनाचे अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार विजेते ज्ञानेश्वर राक्षे, नगरसेवक गजेंद्र अभंग, प्रा.बाबा खरात, नितीन अभंग, संतोष गायकवाड, उत्तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक प्रा.प्रदीप पाटील,संदीप आव्हाड, राजेंद्र आव्हाड, दत्ता लाहुंडे, किशोर साळवे, सचिन शेलार, विजय आव्हाड,देवेंद्र साळवे, विकी साळवे, संजय जमधडे, व्हि.डी.सरकार, विकी पवार, मनीष राक्षे,बाबासाहेब साळवे, विश्वनाथ आल्हाट, दीपक खरात, डी.के.जाधव,संजय शिंदे, सोनू गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, काँग्रेस सेवादलाचे जीवन पांचारिया यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयातही अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना माजी आमदार डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे मोठे योगदान राहिले आहे. बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी अण्णाभाऊ साठे यांनी संघर्ष केला. आपल्या साहित्यामधून क्रांतीज्योत पेटवली. समता व मानवतेचे त्यांचे विचार राज्यघटनेमध्ये आले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना ही आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची आहे. मात्र आज दररोज राज्यघटनेची पायमल्ली होत आहे. काही मूठभर लोक बहुजनांना वंचित ठेव पाहत आहेत. सर्वांनी एकजूट करून आता लढले पाहिजे.

अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून समतेचा विचार आहे. मानवता हा एकच धर्म खरा आहे आणि तो जोपासण्यासाठी आपण काम केले पाहिजे अन्यथा येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य अंधारात असेल. संगमनेर शहरांमध्ये बस स्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्मारक होणार आहे. याचबरोबर लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकारातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे अद्यावत स्मारक लवकरात लवकर होणार आहे यासाठी नगरपालिकेच्या वतीने जागाही निश्चित करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.

तर ज्ञानेश्वर राक्षे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांचे काम मोठे आहे त्यांना भारतरत्न मिळण्यासाठी सर्वांनी पाठपुरावा करावा. याचबरोबर समाजातील प्रत्येकाने शिक्षण घेऊन आपल्या समाजाच्या विकासासाठी योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रा.बाबा खरात यांनी अण्णाभाऊ साठे यांची विविध गीते गायली.

यावेळी संगमनेर शहरातील विविध पक्षांचे व पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते मातंग एकता समाज व सकलमातन समाजाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठे योगदान – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या सशक्त लेखणीमधून कष्टकरी, श्रमिक आणि वंचितांच्या वेदना मांडल्या. फकीरा या लोकप्रिय कादंबरी सह 35 कादंबऱ्या तसेच ३००  कथा लिहिल्या. त्यांचे साहित्य केवळ मराठी भाषेपुरते मर्यादित न राहता 14 भारतीय भाषा तसेच जर्मन, इंग्रजी, पोलीश, रशियन इत्यादी परकीय भाषांमध्ये सुद्धा भाषांतरित करण्यात आले आहे. त्यांचे साहित्य व विचार महाराष्ट्रातील तरुणांसाठी सदैव प्रेरणादायी असून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले असल्याचे काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *