◻️जन्मगाव आश्वी खुर्दसह चंदनापुरी येथील ग्रामस्थ झाले भावूक
आश्वी । झुंझार न्यूज
डोंबिवलीच्या गल्लीबोळांतील संघर्षापासून ते भारतीय क्रिकेटच्या सर्वोच्च शिखरापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास करणाऱ्या संगमनेरच्या अजिंक्य मधुकर रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शांत, संयमी, तंत्रशुध्द आणि विश्वासार्ह फलंदाज म्हणून जगभरात ओळखल्या जाणाऱ्या अजिंक्यच्या या निर्णयामुळे भारतीय क्रिकेटमधील एका सोनेरी पर्वाची सांगता झाली असून, त्याचे जन्मगाव व मामाचे गाव असलेल्या आश्वी खुर्द तसेच मूळ गाव चंदनापुरी (वडीलांचे गाव) येथील ग्रामस्थ भावूक झाल्याचे पहावयास मिळत आहे.
आपल्या प्रदीर्घ आणि यशस्वी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अजिंक्यने भारताचे प्रतिनिधित्व करताना ८५ कसोटी, ९० एकदिवसीय आणि २० टी-२० सामने खेळले. या प्रवासात २०२०-२१ मधील ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक कसोटी मालिका विजय हा त्याच्या कारकिर्दीतील सुवर्णक्षण ठरला. मुख्य खेळाडू दुखापतग्रस्त असताना आणि पहिल्या कसोटीतील दारुण पराभवानंतर अजिंक्यने अत्यंत संयमाने भारतीय संघाचे यशस्वी नेतृत्व केले. त्याच्या या धैर्याच्या आणि उत्कृष्ट नेतृत्वाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत नमवून मालिका जिंकली. संकटसमयी संघाला सावरणारा ‘संकटमोचक’ म्हणून त्याने क्रिकेटविश्वात स्वतःचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले.
अजिंक्यचा जन्म ६ जून १९८८ रोजी त्याच्या मामाच्या गावी म्हणजे आश्वी खुर्द येथे झाला. आश्वी येथील प्रगतशील शेतकरी कै. राधाकृष्ण गणपत गायकवाड यांची कन्या सुजाता यांचा विवाह चंदनापुरी येथील मधुकर रहाणे यांच्याशी झाला. बालपणीच्या सुट्ट्यांमध्ये अजिंक्यचा मोठा वेळ आश्वीमध्येच गेला असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर इतकी मोठी ख्याती मिळवूनही त्याने आपल्या मातीशी आणि नात्यांशी असलेली नाळ कधी तुटू दिली नाही. आश्वी येथील डॉ. गणेश गायकवाड हे अजिंक्यचे मामा असून गायकवाड परिवाराशी त्याचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. व्यस्त वेळापत्रकातून वेळ मिळताच अजिंक्य आवर्जून आश्वी खुर्दला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधत असे. त्याचा साधेपणा आणि नम्रता यामुळे तो गावकऱ्यांसाठी कायम ‘आपला अजिंक्य’ राहिला.
या ऐतिहासिक आश्वी खुर्द गावाला समृध्द परंपरा लाभली आहे. यादवकालीन ताम्रपट परंपरा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक संदर्भ आणि पेशवाई काळातील घोडदळाशी या गावाचा संबंध राहिला आहे. एवढेच नव्हे तर संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांचेही हेच आजोळ होते. या ऐतिहासिक भूमीचे नाव अजिंक्य रहाणेच्या कर्तृत्वामुळे पुन्हा एकदा जागतिक स्तरावर अभिमानाने पोहोचले आहे.
अजिंक्यच्या निवृत्तीच्या बातमीने आश्वी खुर्द आणि पंचक्रोशीतील तरुण तसेच गावकऱ्यांमध्ये अभिमानासोबतच डोळ्यात अश्रू तरळले. “आमच्या गावचा भाचा देशासाठी खेळला आणि त्याने जगभरात भारताचे व आमच्या गावाचे नाव उज्ज्वल केले, त्याच्या मैदानातील खेळीसोबतच त्याचे संस्कार आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत,” अशी सार्थ अभिमानाची भावना आश्वीकरांनी व्यक्त केली.
निवृत्तीची घोषणा करताना अजिंक्यही अत्यंत भावुक झाला होता. “डोंबिवलीतून लोकलने प्रवास करणाऱ्या एका सामान्य मुलाचे भारतासाठी खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाले, हा प्रवास माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे,” अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या. या वेळी त्याने आपले आई-वडील, पत्नी, मुले, प्रशिक्षक, सहकारी खेळाडू आणि जगभरातील चाहत्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
दरम्यान, मैदानातील संयमी फलंदाजी, अद्वितीय नेतृत्व आणि मैदानाबाहेरील उच्च संस्कार जपणारा अजिंक्य रहाणे आता आयुष्याच्या नव्या टप्प्यावर पाऊल ठेवत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला असला, तरी आश्वी खुर्दचा भाचा म्हणून असणारे नाते आणि संगमनेर तालुक्याचा अभिमान कायम अमर राहील. अजिंक्य रहाणेला त्याच्या पुढील वाटचालीसाठी आश्वी खुर्द ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
तीस वर्षांपूर्वी डोंबिवलीच्या रेल्वे मैदानापासून सुरू झालेला अजिंक्यचा प्रवास खडतर होता. कोणत्याही सुविधा किंवा पाठींबा नसताना त्याने केवळ प्रामाणिकपणा आणि निष्ठेच्या जोरावर भारतीय संघाचे यशस्वी नेतृत्व केले. अनेक चढ-उतार आले, पण तो खचला नाही. आमच्यासाठी त्याच्या यशा-अपयशाच्या गोळाबेरजेपेक्षा त्याचा साधेपणा, नम्रता आणि निष्कलंक खेळ सर्वात महत्त्वाचा आहे. जग काहीही म्हणो, तोच आमचा खऱ्या अर्थाने ‘हिरो’ आहे! आयुष्याच्या या दुसऱ्या डावातही त्याला उत्तम यश मिळो, हीच आमची सदिच्छा.
— सौ. सुजाता रहाणे व मधुकर रहाणे (अजिंक्य रहाणेचे आई-वडील)