फ्रेंडशिप डेच्या संदेशातून ९ ऑगस्टच्या चक्काजाम आंदोलनाचे आवाहन

 

 

मुंबई । झुंझार न्यूज 

 

फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आमदार सत्यजीत तांबे यांनी सोशल मीडियावरून केलेल्या आगळ्यावेगळ्या आवाहनाला राज्यभरातून, विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि पुणे परिसरातील तरुणांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे सरळ मार्गानेच व्हावी या मागणीसाठी ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या चक्काजाम आंदोलनात सहभागी होण्याची तयारी अनेक युवक, विद्यार्थी आणि विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी संघटनांनी दर्शवली आहे.

फ्रेंडशिप डेच्या संदेशातून आमदार तांबे यांनी “मित्र एकत्र आले तर मोठा बदल घडवू शकतो” हा संदेश देत आपल्या मित्राला टॅग करण्याचे आणि ९ ऑगस्टच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पोस्ट शेअर होत असून, अनेक विद्यार्थी आपल्या मित्रांसह आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगत आहेत.

विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी तसेच युवक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असून, नाशिक–सिन्नर–संगमनेर–अकोले–आळेफाटा–नारायणगाव–मंचर–राजगुरूनगर–चाकण या सरळ मार्गाची गरज अधोरेखित केली आहे. हा मार्ग विद्यार्थी, शेतकरी, कामगार, उद्योग आणि रोजगाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याची भावना तरुणांमध्ये व्यक्त होत आहे.

 

याबाबत आमदार सत्यजीत तांबे म्हणाले, “ही केवळ रेल्वेची मागणी नाही, तर उत्तर महाराष्ट्राच्या भविष्यासाठीची लोकचळवळ आहे. तरुणांचा वाढता सहभाग आणि महाविद्यालयांमधून मिळणारा पाठिंबा ही या आंदोलनाची सर्वात मोठी ताकद आहे. लोकशाहीत प्रत्येक नागरिकाचा आवाज महत्त्वाचा असतो आणि जेव्हा युवक एकत्र येतात तेव्हा परिवर्तनाचा मार्ग अधिक वेगाने खुला होतो.”

 

९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या चक्काजाम आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी, युवक, शेतकरी आणि विविध सामाजिक संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही आमदार तांबे यांनी केले आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *