लोकसभेत मांडण्यात येणाऱ्या नारीशक्ती विधेयकाला विरोध केल्याच्या निषेधार्थ संगमनेर येथे शहर महिला शिवसेना महायुतीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांच्या विरोधात महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत बसस्थानक परिसर दणाणून सोडला.
बसस्थानक परिसरात मोठ्या संख्येने महिला एकत्र आल्या होत्या. आंदोलनादरम्यान महिलांनी हातात फलक घेऊन “नारीशक्तीचा अपमान अजिबात सहन केला जाणार नाही” आणि “महिलांच्या हक्कांसाठी लढा देऊ” अशा घोषणा दिल्या. महिला सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे हे विधेयक असून, त्याला विरोध करणे म्हणजे महिलांच्या प्रगतीला अडथळा आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या नीलम खताळ, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी आणि संगीता पुंड यांनी केला.
देशातील महिलांना राजकीय व सामाजिक स्तरावर अधिक संधी मिळाव्यात यासाठी नारीशक्ती विधेयक अत्यावश्यक असल्याचे आंदोलनकर्त्यांचे मत आहे. काही विरोधी पक्ष नेत्यांकडून या विधेयकाला विरोध होत असल्याने त्यांचा निषेध करण्यात आला.यावेळी लीलावती काळे, सोनाली बोटवे, पुनम दायमा, संगीता पुंड, सपना जाधव, पूजा आरगडे, आरती पगारे, शोभा सूर्यवंशी, राधा सूर्यवंशी, अरुणा सूर्यवंशी, कोमल सातपुते, स्वाती मुंडलिक, शिवाली सूर्यवंशी, दिपाली वाव्हळ, शिवज्ञा आरगडे, जान्हवी जांबुकर आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.