आश्वी । झुंजार न्यूज
पुणे-नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या राहाता ते पानोडी (संगमनेर) या ३६ किलोमीटरच्या काँक्रीट रस्त्याचे सुमारे १५६ कोटी रुपयांचे काम सुरू झाले आहे. पुणे येथून साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांचे या रस्त्यामुळे ५० ते ६० किलोमीटरचे अंतर घटणार असून संगमनेर तालुक्यातील पुर्व व पठार भागाला विकासाची चालना मिळणार .

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळ, मुंबई या कार्यालयामार्फत हे काम होत आहे. राहाता, दहेगाव, केलवड, पिंपरी- लोकाई, लोहारे, निमगाव जाळी, आश्वी, शिपलापूर व पानोडी या गावांतून हा रस्ता जाणार आहे. संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गाला हा नवीन मार्ग जोडला जाणार आहे. केलवड ते दहेगाव , केलवड ते लोहारे , लोहारे ते निमगांव जाळी , निमगांवजाळी ते आश्वी बु ॥ दरम्यानचा डांबरी रस्ता पूर्णपणे फोडला आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळ, मुंबई कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आला असल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

या रस्ताची दोन्ही बाजूने 21 – 21 मीटर रुंदीकरण वाढणार असल्याने रस्त्यांच्या कडेला असणाऱ्यांचे दाबे दणाणले असून गेल्या तीन – चार महिन्यापासून फोडलेल्या रस्त्यामुळे या रस्त्यातंर्गत गावामध्ये धूळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे .

रस्ता हा राहाता ते आश्वी १० तर शिबलापूर ते पानोडी घाट पर्यंत ७ मीटर रुंद असून, दोन्ही बाजूने दीड – दीड मीटर मुरूमीकरण म्हणजेच एकूण १० मीटरचा हा दोन पदरी मार्ग आहे. केलवड, आश्वी व शिपलापूर या मोठ्या गावांमध्ये १० मीटरचे काँक्रिटीकरण, दोन्ही बाजूने एक-एक मीटर पेव्हिंग ब्लॉक व दोन्ही बाजूने १.२०० मीटर साईड गटार म्हणजेच या तीन गावांमध्ये एकूण १४.५ मीटरचा हा रस्ता असेल. ऑक्टोबर महिन्यात सुरू झालेले हे काम १८ महिन्यांत पूर्ण केले जाईल .

अहिल्यानगर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पर्यटन विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. भाविकांना जिल्ह्यात येण्यासाठी चांगल्या आणि कमी अंतराचे रस्ते विकसित करणे महत्त्वाचे आहे. प्रस्तावित मार्ग भाविक, नागरिक, शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त ठरेल.
