राहाता । झुंजार न्यूज

 

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त राहाता येथील आंबेडकर नगरमधील दलित वस्तीतील ४८ घरकुलांच्या नूतनीकरणाचा कार्यक्रम माजी खा डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

 

 

 

 

या कार्यक्रमात डॉ. सुजय विखे पाटील यांनी गरिबांना त्यांच्या हक्काचे घर देण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, “या ४८ घरकुलांचे काम एका महिन्याच्या आत पूर्ण करून लाभार्थ्यांना घरकुल सुपूर्द केले जाईल.” यावेळी त्यांनी संबंधित इमारतीची पाहणी देखील केली.

 

 

 

 

कार्यक्रमास मुकुंदराव सदाफळ, राहाता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र निकाळे, कैलासराव सोलापूर, भीमराज निकरी, राजेंद्र वाबळे आणि डॉ. स्वाती गाडेकर यांची उपस्थिती लाभली.

 

 

 

 

 

डॉ. विखे यांनी सांगितले की, “शिर्डी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असून प्रत्येक बेघर दलित कुटुंबाला घर देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. लवकरच आंबेडकर नगरमध्ये अंगणवाडीचे कामही सुरू करण्यात येईल, जेणेकरून लहान मुलांना चांगले शिक्षण मिळेल.”

 

 

 

 

 

यावेळी महिलांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचे आभार मानले. पुढील दोन महिन्यांत गोदावरी नदीच्या रुंदीकरणासाठी १९० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार असून पोटचाऱ्यांच्या दुरुस्ती कामांसाठी २९० कोटी रुपयांची तरतूद मंजूर केली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

 

 

 

यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देऊन त्यांच्या विचारांचे स्मरण करत, “आपण सर्वांनी एकत्र येऊन राहाता शहराचा सर्वांगीण विकास साधूया,” असे आवाहनही यावेळी डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

.

 

तसेच डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त उपस्थिती दर्शविली आणि महामानवाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

 

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed