तालुक्यात टंचाईची परिस्थिती गंभीर असताना लोकप्रतिनिधीच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या टंचाई आढावा बैठकीला काही विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत नसतील, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. टंचाई आढावा बैठकीला गैरहजर राहिलेल्या सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावावी, असे सक्त निर्देश आमदार अमोल खताळ यांनी विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना दिले.
नवीन नगर रोडवरील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनात गुरुवारी (दि.१७) सकाळी आमदार खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, महावितरणचे प्रभारी कार्यकारी अभियंता नारायण सोनवणे, उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके, पंचायत समिती पशुसंवर्धन अधिकारी प्रदीप खंडेराव, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र सोनवणे, भाजप तालुकाप्रमुख गुलाब भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाप्रमुख कपिल पवार, तालुकाप्रमुख आबासाहेब थोरात नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा तसेच तालुक्यातील सद्यःस्थितीतील टंचाईचा आढावा घेण्यात आला. यावेळी काही विभागांचे अधिकारी व कर्मचारी बैठकीला उपस्थित नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर आमदार खताळ यांनी नाराजी व्यक्त केली.
‘टंचाई आढावा बैठक गंमत करण्याचा विषय वाटला का?’
आमदार खताळ म्हणाले, तुम्हाला टंचाई आढावा बैठक हा गंमत करण्याचा विषय वाटला का? तालुक्याचा लोकप्रतिनिधी टंचाईसारख्या गंभीर विषयावर बैठक घेत असताना संबंधित अधिकारी उपस्थित राहत नसतील, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी. टंचाईच्या काळात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याऐवजी समन्वयाने काम करण्याची गरज आहे. मात्र, प्रत्यक्षात तसा समन्वय दिसून येत नाही. ज्या गावांमध्ये तसेच वाड्या-वस्त्यांवर सध्या टँकरची आवश्यकता आहे, तेथे तातडीने टँकर सुरू करण्यात यावेत. ग्रामसेवक गावात उपलब्ध नसल्याने नागरिकांना टँकर व पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी आमदारांकडे यावे लागत असेल, तर हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
कार्यालयात बसून टंचाईचे नियोजन होणार नाही
ज्या गावात ज्या अधिकाऱ्यांची किंवा कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे, त्या अधिकारी-कर्मचाऱ्याला संबंधित गावातील परिस्थितीची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. केवळ कार्यालयात बसून टंचाईचे नियोजन करता येणार नाही. टंचाईसारख्या गंभीर विषयात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावातील परिस्थितीची माहिती ठेवावी. तसेच गावागावात प्रत्यक्ष जाऊन टंचाईची पाहणी करावी आणि पाणी, चारा तसेच अन्य आवश्यक बाबींची माहिती प्रशासनाला द्यावी, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
पशुसंवर्धन विभागाच्या गैरहजेरीवरही नाराजी
टंचाईच्या काळात जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत असताना पशुसंवर्धन विभागाचा एकही कर्मचारी बैठकीला उपस्थित नसल्याचे समोर आले. यावर आमदार खताळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तालुक्याचा लोकप्रतिनिधी टंचाईचा आढावा घेत असताना संबंधित विभागाचा एकही कर्मचारी उपस्थित राहू नये, ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून दूध उत्पादकांकडून पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी रवींद्र दातीर व पुंजा डेरे गोरक्ष बागुल यांनी बैठकीत मांडल्या. तसेच सावरगाव तळे येथे आजारामुळे तीन गायींचा मृत्यू झाला; मात्र या घटनेनंतर पशुवैद्यकीय डॉक्टर घटनास्थळी आले नसल्याची तक्रार बाळासाहेब शेटे यांनी केली.
या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करावी, तसेच टंचाईच्या काळात पशुधनासाठी पाणी, चारा आणि पशुवैद्यकीय सेवा वेळेवर उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना आमदार खताळ यांनी दिल्या. बैठकीदरम्यान आमदार खताळ यांनी विविध विभागांच्या कामकाजाबाबत अधिकाऱ्यांना चांगलीच खरडपट्टी काढत, टंचाईच्या काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले.