नागरिकांसाठी पाणी आणि वीज अत्यंत महत्त्वाचे

तालुक्याच्या हक्काचे पाणी व पूर्ण दाबाने वीज मिळालीच पाहिजे– मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी

शेतकी संघाची 67 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

 

 



संगमनेर । झुंझार न्यूज

 

सध्या राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहे. अशावेळी पिकांना पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र तालुक्यात विजेची अत्यंत वाईट अवस्था आहे. आवर्तन काळामध्ये 11 तास लाईट सुरू ठेवण्याबाबत न्यायालयाचे निर्देश असताना ही लाईट बंद ठेवली जात आहे. लाईट जाते म्हणजे पाणी पुढे पण जाते असे सांगताना शेतकऱ्यांसाठी व नागरिकांसाठी पाणी आणि वीज महत्त्वाची असल्याने वेळप्रसंगी आंदोलन केले जाईल असा इशारा काँग्रेस पक्षाचे नेते माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला असून तालुक्याच्या हक्काचे पाणी व पूर्ण दाबाने वीज मिळालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.

जिल्हा सहकारी बँकेच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सभागृहात संगमनेर शेतकी संघाच्या 67 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी चेअरमन संपतराव डोंगरे हे होते. तर व्यासपीठावर मा. आ.डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ जयश्रीताई थोरात, पांडुरंग पाटील घुले, आर.बी राहणे, गणपतराव सांगळे ,रामदास पाटील वाघ, शंकरराव खेमनर ,सुधाकर जोशी,व्हाईस चेअरमन सुनील कडलग, रामहरी कातोरे, शरद नाना थोरात, ॲड. नानासाहेब शिंदे, संपतराव गोडगे, ह भ प बुवाजी बाबा पुणेकर, शेतकी संघाचे संचालक साहेबराव बारवे, बाळकृष्ण होडगर, किरण नवले, भाऊसाहेब नवले, संतोष नागरे , शिवाजी आहेर,तुकाराम कोठवळ, सचिन दिघे, महादू खेमनर, संजय शिरसागर ,भास्कर गोपाळे, विनायक काळे ,सौ मंगलताई ठाकरे ,सौ प्रभावती ढोकरे, मॅनेजर अनिल थोरात, कार्यालयीन अधीक्षक बी. एन. काळे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांनी कृषी औद्योगिक क्रांती मधून शेतकऱ्यांसाठी बाजार समिती शेतकी संघ व सहकारी संस्था उभ्या केल्या. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, प्रभाकरराव भोर, बाळासाहेब गुंजाळ व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी शेतकी संघाची स्थापना केली. शेतकऱ्यांना मदतीसाठी हा संघ आहे. काटकसर हे या संघाचे वैशिष्ट्य राहिले आहे .

अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांची शेतकी संघ ही मातृ संस्था आहे. राज्यातील अनेक शेतकी संघ मोडकळीच आले असताना संगमनेरचा शेतकी संघ मात्र दिमाखात उभा आहे.
नागरिकांचा शेतकी संघाच्या पेट्रोल पंपावर मोठा विश्वास असून आगामी काळामध्ये नवे पर्याय शोधावे लागणार असल्याचे सांगून शेतकी संघाच्या कामकाजाचे कौतुक केले.

याचबरोबर ते म्हणाले की सध्या तालुक्यामध्ये विजेची अत्यंत वाईट अवस्था आहे. याबाबत कोणी बोलत नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. शेतकऱ्यांसाठी पाणी आणि वीज अत्यंत महत्त्वाची आहे.  वीज जाते म्हणजे पाणी पुढे जाते हे लक्षात घ्या.

निळवंडे धरण व दोन्ही कालवे आपण पूर्ण केले .त्यावेळेस कुणी मदतीला आले नाही. संगमनेर शहरासाठी धरणातून थेट पाईपलाईन योजना राबवली. आता डाव्या व उजव्या दोन्ही कालव्यांना अस्तरीकरण करून पाणी पुढे नेले जात आहे. तालुक्याच्या हक्काचे पाणी तालुक्याला मिळाले पाहिजे. याचबरोबर तालुक्यात विजेचा मोठा खेळखंडोबा आहे. रात्री 6 ते 9 या वेळेस सर्वत्र लोड शेडिंग केले जात आहे. मागील तीन-चार दिवसात तर पूर्णपणे विस्कळीतपणा झाला आहे. त्यावर कुणाचे नियंत्रण नाही.

1989 मध्ये भंडारदरा धरणाचे 30 टक्के हक्काचे पाणी आपण मिळवले. त्यानंतर मा. न्यायालयातून आवर्तन काळामध्ये 11 तास वीज मंजूर करून घेतली. हे सर्व संघर्ष करून मिळवले आहे. ते टिकवले पाहिजे. मात्र मागील दोन वर्षापासून पाणी व विजेबाबत पूर्णपणे अन्याय केला जात आहे. त्याबाबत कोणी बोलत नाही. शेतकरी व नागरिकांनी याबाबत जागरूक झाले पाहिजे.

तालुक्यात व सर्वत्र दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पिके सुकू लागली आहेत. पिकांना पाण्याची गरज आहे .अशावेळी विजेचा गोंधळ निर्माण केला जात जात आहे. तालुक्याचे हक्काचे पाणी व पूर्ण दाबाने सुरळीत वीज मिळालीच पाहिजे अन्यथा वेळप्रसंगी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.

तर संपतराव डोंगरे म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकी संघाने रासायनिक खते, अन्नधान्य शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे. तालुक्यामध्ये पेट्रोल पंपाची संख्या वाढली आहे. गावोगावी खतांचे दुकाने झाली आहेत. शेतकऱ्यांना मध्ये युरिया टंचाईला सामोरे जावे लागले लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या आग्रही मागणीमुळे सरकारने त्यांच्या ताब्यात असलेली बफरस्टॉक युरिया दिली . गुणवत्ता असल्यामुळे शेतकी संघाच्या पेट्रोल पंप व इतर धान्यांना मागणी आहे. ही वैभवशाली वाटचाल कायम सुरू ठेवून शेतकऱ्यांना मदत करावयाची असल्याचे ते म्हणाले.

यावेळी संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते , सेवा सोसायटी यांची प्रतिनिधी चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वार्षिक सभेचे स्वागत व्हा.चेअरमन सुनील कडलग यांनी केले नोटीस वाचन मॅनेजर अनिल थोरात यांनी केले. तर मनीष गोपाळ यांनी आभार मानले.

सरकारच्या धोरणामुळे खतांच्या रकमेमध्ये मोठी वाढ

आपण कृषिमंत्री असताना 350 रुपयाला युरिया गोणी होती. आता तिचे भाव गगनाला भिडले आहेत. बफरस्टॉपच्या नावाखाली युरिया रखडून ठेवली जात आहे. शेतकऱ्यांना बळजबरीने युरिया सोबत दुसरे खत दिले जात आहे. युरियाचा बफर स्टॉक हा सरकारचा असतो त्यावर कृषी अधिकाऱ्यांचे नियंत्रण असते आणि ते बदनामी मात्र शेतकी संघाची करतात. आपल्या शेतकी संघाने कायम शेतकऱ्यांची मदत केली आहे. या शेतकऱ्यांच्या संस्था आहेत. मात्र काही लोकांना ते पहावत नाही. पाणी वीज या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी त्यांचे मुरूम व वाळू कडे लक्ष असल्याची टीका त्यांनी केली.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *