न बोलणाऱ्याला बोलका करणारे व्यक्तीमत्व म्हणजे आपल्या कमविणाऱ्या पुंजीतून बचतीचा मार्ग दाखवून सामान्य व्यावसायिकांना आर्थिक उभारीचा आशेचा किरण दाखवला आणि ज्या चेहऱ्याने नेहमी प्रत्येकाला आपुलकीचे निखळ हास्य दिले, तोच हसरा चेहरा काळाने अचानक हिरावून घेतला. आश्वी खुर्द (ता. संगमनेर) येथील सर्वांचे लाडके, दांडगा लोकसंग्रह असलेले मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व तान्हाजी रावबा गायकवाड (वय – ५२) यांचे बुधवारी सायंकाळी ५:३० वाजता उपचारादरम्यान आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण आश्वी पंचक्रोशीतील गावांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
दिवंगत तान्हाजी गायकवाड हे गेली अनेक वर्षे बॅक व पतसंस्थांचे ‘पिग्मी एजंट’ (दैनिक बचत प्रतिनिधी) म्हणून पंचक्रोशीत कार्यरत होते. मात्र, लोकांच्या दृष्टीने ते निव्वळ बॅक प्रतिनिधी नव्हते, तर सुख-दुःखात धावून येणारे कुटुंबातीलच एक सदस्य होते. रोज सायंकाळी दुचाकीवरून गावात येताना ते सर्वाशी आपुलकीने आणि गोड बोलत. आता पुन्हा कधीही त्यांचे गोड बोलणे ऐकायला व हसरा चेहरा पहावयास मिळणार नाही, या विचारानेच परिसरातील ग्रामस्थ व व्यापारी सुन्न झाले आहेत.
प्रवरा बॅकेच्या ‘पद्मश्री कर्ज योजने’च्या माध्यमातून त्यांनी हातावर पोट असणाऱ्या अनेक तरुणांना, छोट्या व्यावसायिकांना कर्ज मिळवून दिले. केवळ कर्ज मिळवून दिले नाही, तर “तूम्ही व्यवसाय सुरू करा, मी पाठीशी उभा आहे.” असा धीर देऊन कित्येकांचे संसार उभे केले. त्यांच्या याच प्रामाणिकपणामुळे आणि निःस्वार्थी स्वभावामुळे बॅकेच्या वसुलीतही ते विश्वासाचे नाव राहिले. स्वतःच्या संसारातही उत्तम संस्कारांची पेरणी करत त्यांनी अत्यंत सुसंस्कृत कुटुंब घडवले. प्रगतशील शेतकरी आणि पशुपालक म्हणून देखील त्यांनी आपल्या कामांचा ठसा उमटवला आहे.
गुरुवारी (दि.१७) सकाळी आश्वी खुर्द येथील प्रवरा नदीतीरावर अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जड अंतःकरणाने आणि पाणावलेल्या डोळ्यांनी पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी तान्हाजींना अखेरचा निरोप दिला. चितेला भडाग्नी देताना उपस्थित प्रत्येकाचा कंठ दाटून आला होता. सामाजिक, राजकीय, सहकार क्षेत्रातील मान्यवरांसह लहानमोठे व्यावसायिक, शेतकरी आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
दरम्यान, त्यांच्या निधनाने गायकवाड कुटुंबावर दुःखाचा प्रचंड आघात झाला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी मंगल गायकवाड (माजी ग्रामपंचायत सदस्या), दोन मुले शुभम व साईराज, दोन बहिणी, मेहुणे असा मोठा परिवार आहे.