‘वारी संविधानाची आली आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत संगमनेरात १४२६ वी राज्यस्तरीय संविधान प्रशिक्षण कार्यशाळा
आश्वी । झुंझार न्यूज
“संविधान म्हणजे केवळ हक्क नव्हे, तर विचार, कर्तव्य आणि संस्कार आहेत. लोकशाहीची सुरुवात सर्वप्रथम आपल्या घरातून झाली पाहिजे. आपण कितीही मोठे झालो तरी आई-वडिलांना विसरू नका; तेच आपली खरी संपत्ती आहेत,” असे प्रतिपादन ‘वारी संविधानाची आली आपल्या दारी’ उपक्रमाचे राज्य प्रमुख व संविधान प्रमुख व्याख्याते तुषार पगारे यांनी केले.
‘वारी संविधानाची आली आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत संगमनेर महाविद्यालयातील साईबाबा हॉलमध्ये तालुक्यातील शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी १४२६ वी राज्यस्तरीय प्रथम संविधान प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत प्रमुख संविधान वक्ते म्हणून तुषार पगारे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी नाशिक विभागीय समन्वयक सिद्धार्थ मेहेरखांब, संगमनेर शिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड, राष्ट्रीय संविधान मंच प्रमुख ॲड. रंजनाताई गवांदे, तालुका समन्वयक किशोर वाघमारे, रायतेचे सरपंच गौतम रोहम, मुजम्मीन चौधरी, संगमनेर महाविद्यालयाचे उपप्राचार्य ढमक, केंद्रप्रमुख श्रीमती घुले, अक्षय खतोडे, बाळासाहेब जाधव, संजय लहारे, पत्रकार राजेश गायकवाड यांच्यासह प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तुषार पगारे यांनी संविधानातील विविध पैलू उलगडून सांगितले. संविधान आपल्याला हक्कांसोबत कर्तव्याचीही जाणीव करून देते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या हक्कांची मागणी करण्यापूर्वी आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
“लोकशाहीची पद्धत प्रथम आपल्या घरातून सुरू करा. आधी आपली कर्तव्ये पार पाडा. आपण कितीही मोठे व्हा, मात्र आई-वडिलांना कधीही विसरू नका. आई-वडिलांशिवाय कोणीही मोठे होत नाही,” असे सांगत त्यांनी कुटुंबातील संस्कार आणि जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले.
‘जैसे पेराल तसे उगवत असते,’ या उक्तीचा दाखला देत आपल्या विचारांची आणि कृतीची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे, असेही पगारे यांनी स्पष्ट केले.
यावेळी तुषार पगारे म्हणाले की, साधू-संतांनी कधीही जातीभेदाचा संदेश दिलेला नाही. त्यांनी समानता आणि बंधुतेची शिकवण दिली. हाच विचार संविधानातून पुढे नेण्यात आला आहे. वारकरी संप्रदायानेही समानता, बंधुता आणि माणुसकीचा संदेश समाजाला दिला आहे. त्यामुळे संविधानातील मूल्ये ही समाजाला जोडणारी असून प्रत्येक व्यक्तीने ती आचरणात आणणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
तर “संविधान जो वाचेल आणि समजून घेईल, तो खऱ्या अर्थाने समाजाला बरोबर घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. समाजाचे परिवर्तन करायचे असेल तर पहिल्यांदा आपल्यामध्ये परिवर्तन घडवून आणले पाहिजे,” असे सांगत संविधानाचा अभ्यास केवळ परीक्षा किंवा शासकीय कामापुरता मर्यादित न ठेवता दैनंदिन जीवनात संविधानिक मूल्यांचा वापर झाला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.
तर ‘वारी पंढरीची, वारी संविधानाची’ या संकल्पनेतून संविधानाचा विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू असून ‘वारी संविधानाची आली आपल्या दारी’ या माध्यमातून शासकीय स्तरावर सर्व विभागांमध्ये संविधानाच्या कार्यशाळा घेऊन प्रत्येकाला संविधानाचे महत्त्व पटवून देणे हे या उपक्रमाचे ध्येय आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या संविधान प्रशिक्षण कार्यशाळांसाठी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी प्रत्येक आमदारांना पत्रक काढून सहकार्य करण्याचे आवाहन केल्याचेही पगारे यांनी यावेळी सांगितले.
या कार्यशाळेच्या माध्यमातून संविधान, लोकशाही, कर्तव्य, समानता, बंधुता आणि सामाजिक परिवर्तन याबाबत शिकवण मिळाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब जाधव यांनी केले, तर आभार संजय लहारे यांनी मानले.