चेअरमन सुधाकर जोशी यांची माहिती
संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेरच्या अर्थ विश्वातील प्रमुख मापदंड असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेने जुन 2025 अखेर एक हजार कोटी रुपये व्यवसायाचा टप्पा पार केला असुन हा विक्रम केवळ ग्राहकांच्या भागीदारीमुळे शक्य झाला असल्याची माहिती चेअरमन सुधाकर जोशी यांनी दिली.

बँकेच्या व्यवसाय वाढीबद्दल व संगमनेरच्या प्रथम महिला नगराध्यक्षा सौ दुर्गाबाई तांबे यांचा वाढदिवस संग्राम मुकबधीर विद्यालय येथे आषाढी एकादशीच्या दिवशी संपन्न झाला. या समारंभाचे अध्यक्षस्थानी डहाणू येथील उद्योजक श्री धीरजभाई ठाकुर होते.

याप्रसंगी चेअरमन सुधाकर जोशी यांनी सांगितले, राज्याचे ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांचे मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली बँक दैदीप्यमान कामगिरी करत आहे. बँकेचे प्रगतीत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजितदादा तांबे, डॉक्टर जयश्रीताई थोरात व सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांचे योगदान आहे. बँकेकडे जुन अखेर 602 कोटी इतक्या ठेवी आहेत तर एकुण कर्ज वाटप 403 कोटी पेक्षा अधिक झाले आहे. तर मार्च 2026 अखेर 1100 कोटी रुपये व्यवसायाचे उद्दिष्ट ठेवले आहे. हा व्यवसाय करत असताना बँकेने नेट एनपीएचे प्रमाण शून्य टक्के राखण्यामध्ये यश मिळवले आहे.गत अडीच वर्षांत बँक व्यवस्थापन मंडळाने सर्व ग्राहक सभासद आणि कर्मचारी हिताचे अनेक निर्णय घेतले. बँकेत मानव संसाधन, नियोजन आणि विकास, बँकींग ग्रंथालय निर्मिती, संपत्ती नियमन विभाग यांची निर्मिती करण्यात आली. तर आय टी, आॅडीट आणि डिजीटलायझेशन विभागाचे सक्षमीकरण करण्यात आले आहे. नेटवर्कींग व्यवहार करण्यासाठी बँकेने विशेष पुढाकार घेऊन आयएमपीएस, एटीएम, फोन पे,क्यु आर कोड या बाबी ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. या सेवांचा लाभ अनेक ग्राहक घेत असल्याचे दिसून येते. या आर्थिक वर्षामध्ये पुढील महिन्यांमध्ये देव कवठे या ठिकाणी बँकेची नूतन शाखा सुरू करण्यात येणार आहे.

याप्रसंगी वृक्षारोपण करण्यात आले. तर बँकेच्या वतीने मुकबधीर विद्यार्थ्यांचे भोजनासाठी कायमस्वरूपी 30 डायनिंग टेबल व 120 खुर्च्या भेट देण्यात आल्या . या भेट वस्तुमुळे विद्यार्थ्यांना आनंद झाला. आषाढी दिंडी काढून आनंद साजरा करण्यात आला. विद्यार्थ्याना यावेळी क्रिकेट साहित्य बँकेच्या वतीने देण्यात आले. तर बँकेच्या नवीन वसुली वाहनाचे पुजन मान्यवरांनी केले.

यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन अँड. नानासाहेब शिंदे, उद्योजक ठाकुर, एसएमबीटीचे विश्वस्त मुख्याध्यापक दशरथ वरपे यांनी मनोगते व्यक्त केली. प्रास्तविक संग्रामचे विश्वस्त सचिव डॉ. नामदेवराव गुंजाळ यांनी केले.तर आभार मुख्याध्यापक शिवनाथ कवडे यांनी मानले. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराथी, सर्व संचालक, कर्मचारी, संग्रामचे सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
