संगमनेर । झुंझार न्यूज

 

राज्यातील मराठी शाळा बंद करण्याचा शासनाचा अप्रत्यक्ष घाट सुरू असल्याची टीका माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली. नेवासा तालुक्यातील दौऱ्यादरम्यान विविध शाळांना भेटी देताना त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील गंभीर समस्या अधोरेखित करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

या भेटीदरम्यान अनेक शाळांमध्ये शिक्षक व संस्थाचालकांमध्ये तीव्र नाराजी व उदासीनता दिसून आली. शिक्षक भरती न झाल्यामुळे अनेक ठिकाणी शिक्षकांची कमतरता निर्माण झाली असून, त्याचा थेट परिणाम शिक्षणाच्या गुणवत्तेवर होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिक्षकांचे मुख्य काम अध्यापनाचे असताना त्यांच्यावर विविध अशैक्षणिक कामांचा मोठा ताण टाकला जात आहे. वारंवार एकाच प्रकारची माहिती ऑनलाईन मागवली जात असल्याने शिक्षकांचा मौल्यवान वेळ वाया जातो आणि विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

.

याशिवाय, शिक्षण विभागातील काही अधिकारी किरकोळ कारणांवरून शिक्षकांना दमदाटी करतात तसेच छोट्या बाबींवर आर्थिक दंड आकारतात, हे प्रकार चिंताजनक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, अनेक शाळांना क्रीडा व कला शिक्षक उपलब्ध करून दिले जात नाहीत. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती बंद असून, शाळांना अपेक्षित अनुदानही मिळत नसल्याने आवश्यक सोयी-सुविधा निर्माण करण्यात अडचणी येत आहेत.

शासनाने या सर्व बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा मराठी शाळांची परिस्थिती आणखी बिकट होईल, असा इशारा डॉ. सुधीर तांबे यांनी दिला.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed