अकोले पोलिसांच्या आणि उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; आरोपी अटकेत
अकोले । झुंझार न्यूज
अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी शुक्रवारी सायंकाळी अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत एक धाडसी कारवाई केली. निळवंडे धरण विश्रामगृह रस्त्यालगत असलेल्या एका टेकडीवरील अवैध दारूचा अड्डा आमदारांनी स्वतः छापा टाकून उघडकीस आणला. या कारवाईमुळे अकोले पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार डॉ. किरण लहामटे हे शुक्रवारी सायंकाळी आपल्या एका खाजगी सहायकासह मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. निळवंडे धरण विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जात असताना, त्यांना टेकडीवरील एका पडक्या घराच्या परिसरात संशयास्पद गर्दी दिसून आली. काहीतरी काळबेरं असल्याचा संशय आल्याने आमदारांनी तात्काळ आपली गाडी थांबवली आणि कोणाचीही वाट न पाहता ते एकटेच त्या टेकडीवरील घराच्या दिशेने निघाले. आमदारांना आपल्या दिशेने येताना पाहताच, तिथे जमलेल्या तळीरामांची आणि विक्रेत्यांची पाचावर धारण बसली. कारवाईच्या भीतीने तेथील १० ते १२ जणांनी अंधाराचा फायदा घेत तिथून पोबारा केला.
आमदार लहामटे त्या पडक्या घरात पोहोचले असता, त्यांना तिथे चक्क देशी दारूच्या बाटल्यांचा साठा आढळला. एका सॅकमध्ये देशी दारूच्या भरलेल्या बाटल्या होत्या, तर घराच्या मागील बाजूस रिकाम्या बाटल्यांचा खच आणि गोण्या पडलेल्या होत्या. धक्कादायक बाब म्हणजे, तिथे ऑनलाईन पेमेंट स्वीकारण्यासाठी एक मोबाईल फोनचा स्कॅनर देखील ठेवण्यात आला होता, ज्यावरून हा व्यवसाय किती संघटितपणे सुरू होता हे स्पष्ट झाले. आमदारांनी स्वतः पुढाकार घेत तेथील एका दुचाकीची हवा सोडून दिली जेणेकरून पुरावा नष्ट होऊ नये.
या घटनेनंतर आमदार लहामटे यांनी तात्काळ अकोले पोलिसांना फोन करून घटनास्थळी पाचारण केले. त्यानंतर त्यांनी स्वतः पोलीस स्टेशन गाठले. अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर, संबंधित जागा मालकावर आणि या भागातील बीट अंमलदारावर कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. “लोकप्रतिनिधीला जर रस्त्याने जाताना अवैध धंदे दिसत असतील, तर पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाला ते का दिसत नाहीत?” असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित झाला आहे.
आमदारांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर पोलीस यंत्रणा हलली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दारूचा साठा आणि इतर मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सुरेश अरुण गायकवाड (रा. मेहेंदुरी) या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आमदार डॉ. किरण लहामटे यांनी स्वतः केलेल्या या ‘स्टिंग ऑपरेशन’ची सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चा सुरू असून, अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.