८ ते १५ जून दरम्यान गुंजाळवाडीत अध्यात्म आणि आधुनिकतेचा संगम; आद्य शंकराचार्यांच्या पादुकांचे होणार दर्शन
आश्वी । झुंझार न्यूज
संगमनेर शहराजवळील गुंजाळवाडी येथे आयोजित प. पू. गगनगिरी महाराज भव्य सप्ताह सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. भक्ती, अध्यात्म, संस्कार, कृषी आणि समाजप्रबोधनाचा अनोखा संगम घडवून आणणाऱ्या या सोहळ्यासाठी संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण असून, हजारो भाविकांच्या स्वागतासाठी गुंजाळवाडी सज्ज झाली आहे.

विश्वगौरव विभूषित महायोगी प.पू. गगनगिरी महाराज यांच्या प्रेरणेतून ही परंपरा यंदा ८ ते १५ जून या कालावधीत राजापूर रोडवरील जयवंतराव व बाळासाहेब गुंजाळ पाटील (गुंजाळवाडी मळा) येथे साजरी होत आहे. सप्ताह समिती, गगनगिरी महाराज भक्त परिवार आणि ग्रामस्थांच्या लोकसहभागातून या सोहळ्याचे भव्य नियोजन करण्यात आले आहे.
सप्ताहामध्ये दररोज पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये हरिनाम, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ आणि कीर्तनसेवा होणार आहे. विशेष म्हणजे, प्रसिद्ध रामायणाचार्य रामराव ढोक महाराज यांची रसाळ ‘श्रीराम कथा’ दररोज सायंकाळी ७ ते १० या वेळेत भाविकांना ऐकायला मिळणार आहे.

यावर्षीच्या सप्ताहाचे विशेष आकर्षण म्हणजे सनातन धर्माचे अध्वर्यू आद्य शंकराचार्य यांच्या पवित्र पादुकांचे आगमन. बुधवार, १० जून रोजी सकाळी ९ वाजता या पादुका भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध होणार आहेत. या दुर्मिळ योग लाभणार असल्याने भाविकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्यासाठी दररोज सकाळी ११ वाजता व्याख्यानमाला आयोजित केली आहे. यामध्ये नंदकुमार पोवार, इंद्रजीत देशमुख, डॉ. संजय मालपाणी, भास्कर पेरे पाटील आणि शालिनीताई देशमुख-इंदोरीकर आपले विचार मांडणार आहेत. तसेच दुपारी ३ वाजता समाधान महाराज शर्मा, संजय महाराज पाचपोर, जयंत महाराज पाटील, विशाल महाराज खोले, सोमनाथ महाराज सानप, उद्धव महाराज मंडलिक आणि निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांसारख्या दिग्गज कीर्तनकारांची कीर्तनसेवा होणार आहे.

‘गगन भरारी’ कृषी महोत्सव: आधुनिक शेतीचा मंत्र
केवळ अध्यात्मच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘गगन भरारी कृषी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये १०५ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असून, आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती येथे मिळणार आहे. ९ जून रोजी प.पू. स्वामी नरेंद्र महाराज यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

१५ जूनला सांगता सोहळा
या सप्ताहाची सांगता रविवार, १५ जून रोजी सकाळी १० वाजता ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या काल्याच्या कीर्तनाने होईल. त्यानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

या भव्य सोहळ्याचा लाभ तालुक्यातील व परिसरातील जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा, असे आवाहन सप्ताह समिती व गुंजाळवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
Post Views: 23


