संगमनेर । झुंझार न्यूज
अकोले – संगमनेर परिसरातील ऐतिहासिक वारसा जतन करून तो नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘हेरिटेज वॉक’ उपक्रमांतर्गत रविवारी पेमगिरी येथील ऐतिहासिक शहागड (प्रेमगड) आणि महाकाय वटवृक्ष तिसऱ्या अभ्यास सहलीचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले होते.

सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयाचा इतिहास विभाग व जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला.

सकाळी संगमनेर बसस्थानकातून सहलीला प्रारंभ झाला. पेमगिरी येथे पोहोचल्यानंतर सहभागी सदस्यांनी शहागडाचा इतिहास, तेथील सातवाहन टाके स्थापत्यवैशिष्ट्ये आणि ऐतिहासिक महत्त्व समजून घेतले.

यावेळी इंजिनिअर नानासाहेब खर्डे यांनी प्राचीन ते मध्ययुगीन इतिहासाचा आढावा घेत सातवाहनकालीन पाण्याच्या टाके याबाबत सविस्तर माहिती दिली.संयोजक प्रा.विठ्ठलराव शेवाळे यांनी शहाजी महाराजांच्या कार्याचा विशेष उल्लेख करताना सांगितले की, निजामशाहीचा वारसदार मुर्तजा याला जीवधन किल्ल्यावरील नजरकैदेतून मुक्त करून शहाजी महाराजांनी पेमगडावर आणले आणि त्याला गादीवर बसवून स्वतः सन १६३३ ते १६३६ या काळात कारभार सांभाळला. स्वराज्याच्या संकल्पनेची बीजे याच भूमीत रुजली आणि शहाजीराजांच्या पावलांनी हा गड पावन झाला.छत्रपती शिवरायांमध्ये स्वराज्याची बीज रोपन केले आणि जिजाबाईंनी खतपाणी घातले,असे नमूद केले.
यानंतर सहभागी सदस्यांनी पेमगिरी येथील महाकाय वटवृक्षाला भेट दिली. वाल्मीक कोल्हे आणि डॉ.भुतांबरे यांच्या मालकीच्या शेतातील या वटवृक्षाचा इतिहास, त्याचा अडीच ते पावणेतीन एकरांपर्यंत विस्तार आणि ‘जाखमत बाबा’शी संबंधित लोककथा यांची प्रा.शेवाळे यांनी रंजक माहिती दिली.त्यानंतर सर्वांनी गावातील प्राचीन मारुती मंदिरात दर्शन घेतले.

सहली दरम्यान वाल्मीक कोल्हे परिवारातर्फे अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारनंतर सर्व सदस्य सुखरूप संगमनेर येथे परतले.प्रकल्प प्रमुख रमेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. प्रा. विठ्ठल शेवाळे यांनी सहलीचे नियोजन केले तर डॉ.माणिकराव शेवाळे यांनी स्कूलबसची सुविधा उपलब्ध करून दिली. या उपक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश आरोटे, डॉ.उमा कुलकर्णी, सतीश मालवणकर,ॲड.ज्ञानदेव सहाणे यांच्यासह इतिहास विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
‘हेरिटेज वॉक’ उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक ऐतिहासिक स्थळाचा इतिहास, वास्तुशैली आणि त्यामागील संदर्भ तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून अत्यंत रंजक आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने उलगडला जातो. त्यामुळे या उपक्रमात युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचाही उत्स्फूर्त सहभाग वाढत असून, हा अनुभव माहितीपूर्ण, प्रेरणादायी आणि आनंददायी ठरत असल्याची भावना सहभागी सदस्यांनी व्यक्त केली.

