भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या कुटुंबांचा वारसा समर्थपणे पुढे चालवणारे, संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील अभ्यासू व्यक्तिमत्व सुधाकर प्रभाकर रोहम यांना ‘राज्यस्तरीय गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. संविधान दिनाच्या ७५ व्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून तेजस प्रतिष्ठानच्या वतीने संगमनेर येथील मालपाणी लॉन्सवर आयोजित दिमाखदार सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत अहिल्यानगर जिल्ह्यातून एक निष्ठावंत शिलेदार म्हणून दिवंगत माजी आमदार दादासाहेब तथा पी. जे. रोहम यांनी काम केले होते. बाबासाहेबांनी त्यांना स्वतंत्र मजूर पक्षाची उमेदवारी दिली होती आणि ते आमदार म्हणून निवडून आले होते. विशेष म्हणजे, दादासाहेब रोहम यांच्या निमंत्रणावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात २१ दिवस मुक्काम केला होता. याच मुक्कामादरम्यान त्यांनी ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला, हा ऐतिहासिक वारसा रोहम कुटुंबाला लाभला आहे.
वडिलांचा हा वैचारिक वारसा सुधाकर रोहम गेल्या ५० वर्षांपासून कोणतीही पदाची अपेक्षा न ठेवता, निस्वार्थीपणे पुढे चालवत आहेत. आंबेडकर चळवळीतील त्यांचे हे सातत्यपूर्ण योगदान पाहून तेजस फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. घोसाळे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातून अशा ७५ निवडक कुटुंबांचे सर्वेक्षण केले होते. त्यात अहिल्यानगर जिल्ह्यातून सुधाकर रोहम यांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड संघराज रुपवते होते तर अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे, ज्येष्ठ नेते विजयराव वाकचौरे, माणिकराव यादव, तेजस प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. घोसाळे सर, के. जी. भालेराव , ॲड. प्रियंका गारे, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस दादू विष्णू यादव, संगमनेर तालुकाध्यक्ष साहेबराव यादव, सरचिटणीस जालिंदर बोरडे, ज्येष्ठ नेते दिलीप यादव, रावसाहेब भालेराव, स्वातंत्र्यसैनिक गोपीनाथ वाघमारे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष किशोर वाघमारे आदीसह आंबेडकर चळवळीतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुधाकर रोहम यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, हा पुरस्कार म्हणजे माझ्या वडिलांच्या कार्याचा आणि संघर्षाचा सन्मान आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.