आश्वी । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे अधिकमासाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या ‘परमपूज्य श्री स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाचा’ सोमवारी (दि. ८) अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. भव्य मिरवणुकीने या सोहळ्याची सुरुवात झाली असून, संपूर्ण परिसर जणू भक्तीच्या महापुरात न्हाऊन निघाला आहे.


सप्ताहाच्या निमित्ताने सोमवारी सकाळी १०:३० वाजता संगमनेर बसस्थानक परिसरातील दत्त मंदिरापासून भव्य मिरवणुकीस सुरुवात झाली. या मिरवणुकीसाठी संपूर्ण मार्ग आकर्षक स्वागत कमानींनी सजवण्यात आला होता. सर्वत्र फडकणाऱ्या भगव्या पताकांमुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. सजवलेल्या रथात प.पू. श्री स्वामी गगनगिरी महाराजांची देखणी मूर्ती विराजमान करण्यात आली होती. या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.

मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे डोक्यावर तुळशीवृंदावन आणि कलश धारण केलेल्या हजारो महिला भगिनी. ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ आणि ‘स्वामी गगनगिरी महाराजांचा विजय असो’ अशा जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या निनादाने अवघे आकाश दुमदुमून गेले. फटाक्यांच्या आतषबाजीने मिरवणुकीत अधिकच रंग भरला. सुमारे दोन तास चाललेली ही मिरवणूक गुंजाळवाडी येथील मुख्य सप्ताहस्थळी विसर्जित झाली.

मिरवणूक सप्ताहस्थळी पोहोचल्यानंतर प.पू. श्री स्वामी गगनगिरी महाराजांच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी शास्त्रोक्त पद्धतीने घटस्थापना करून सप्ताहाचा संकल्प करण्यात आला. त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायणास प्रारंभ झाला, ज्यामध्ये शेकडो भाविक सहभागी झाले आहेत.


सप्ताहाच्या पहिल्या दिवशी दुपारी ह.भ.प. उमेश महाराज दशरथे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. त्यांनी आपल्या निरूपणातून भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शनाचा लाभ करून दिला. सायंकाळी हरिपाठाचे वाचन झाल्यानंतर, रात्री ७ वाजता ख्यातनाम कीर्तनकार ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांच्या ‘रामायण कथे’चे पहिले पुष्प गुंफण्यात आले. ढोक महाराजांच्या ओघवत्या शैलीतील कथा ऐकण्यासाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली होती.


गुंजाळवाडी ग्रामस्थ आणि सप्ताह समितीच्या वतीने या महोत्सवाचे नेटके नियोजन करण्यात आले आहे. सप्ताहाच्या निमित्ताने परिसरात भक्ती, श्रद्धा आणि नामस्मरणाचा अखंड जागर सुरू असून, पुढील सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *