संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि वीर एकलव्य यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत उत्साही वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि वीर एकलव्य यांच्या स्मारकाचे भूमिपूजन विविध मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या निमित्ताने आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी ग्रामस्थांचे डोळ्यांचे पारणे फेडले .
जयंती महोत्सवाची सुरुवात दुपारी ४ वाजता आदिवासी कलागुणांच्या सादरीकरणाने झाली. अकोले तालुक्यातील सुप्रसिद्ध आदिवासी नृत्य पथकांनी आपली कला सादर केली. तसेच गावातील आदिवासी महिलांनी पारंपरिक नृत्य सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. महिलांच्या कलागुणांना ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला.
सायंकाळी ६ ते ८ या वेळेत महामानवांच्या प्रतिमेची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. डिजेच्या संगितानने व निळ्या- पिवळ्या झेंड्याबरोबर गुलालाच्या उधळणीत निघालेल्या या मिरवणुकीने संपूर्ण गाव दुमदुमले होते. रात्रीच्या वेळी करण्यात आलेल्या भव्य फटाक्यांच्या आतषबाजीमुळे आसमंत रंगीबेरंगी प्रकाशाने उजळून निघाला होता.
मिरवणुकीनंतर नियोजित स्मारकाच्या जागेवर मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून आणि श्रीफळ वाढवून स्मारकांचे भूमिपूजन करण्यात आले. यानंतर झालेल्या अभिवादन सभेत वक्त्यांनी महामानवांच्या विचारांवर प्रकाश टाकला. सभेचे सूप वाजल्यानंतर सर्व उपस्थित जनसमुदायासाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमाचा समारोप सुप्रसिद्ध गायक अविनाश कदम यांच्या बहारदार कार्यक्रमाने झाला. त्यांनी सादर केलेल्या भीम गीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या संगीतमय कार्यक्रमाला तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळाला.
या संयुक्त जयंती उत्सव सोहळ्याला पद्मश्री डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ भुसाळ, पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते सरुनाथ उंबरकर,संगमनेर शेतकी संघाचे संचालक भाऊसाहेब पाटील खेमनर ,भाजपा तालुकाध्यक्ष गोकूळ दिघे,सरपंच अर्चनाताई भुसाळ, पोलीस पाटील वैशालीताई मैड ,आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष आशिष शेळके,भाजपा आश्वी गट प्रमुख ॲड. रवि शेळके, वीर एकलव्य स्मारक समितीचे अध्यक्ष अनिल बर्डे, रिपब्लिकन पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष विजय खरात, उपाध्यक्ष बाळासाहेब कदम, तालुका सचिव नानासाहेब कदम, समाजसेवक गणेश भुसाळ, जनार्धन साळवे, सिद्धार्थ खरात, भारतराव गायकवाड, विजय मुन्तोंडे , प्रवरा सहकारी साखर कारखान्याची माजी संचालक भागवतराव उंबरकर , सामाजिक कार्यकर्ते सुरेश भुसाळ , ग्रा प माजी सदस्य विजय शेळके , अनिकेत खरात यांच्यासह उंबरी बाळापूर आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे आणि एकोप्याचे वातावरण पाहायला मिळाले.