राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिलेंसाठी महायुतीचे शक्तीप्रदर्शन; ३५ हजार युवकांना रोजगाराची ग्वाही
झरेकाठी । झुंझार न्यूज
राज्यातील बळीराजाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध असून, आगामी खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात येईल. तसेच, प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतील महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारासाठी आयोजित भव्य जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, मोनिका राजळे, अमोल खताळ, काशिनाथ दाते सर, विक्रम पाचपुते, विठ्ठल लंघे, प्रसाद लाड, स्नेहलता कोल्हे, डॉ. बाबुराव तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे, ज्येष्ठ नेते ॲड. सुभाष पाटील, अलकाताई कर्डिले, महापौर ज्योती गाडे, सुवर्णा कोतकर, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांना दिवसा आणि मोफत वीज
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, “शेतकऱ्यांना वीजेच्या समस्येपासून मुक्त करण्यासाठी पुढील चार महिन्यांत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसा आणि मोफत वीज देण्याचा शासनाचा मानस आहे. ही केवळ घोषणा नसून आमची शेतकऱ्यांशी असलेली बांधिलकी आहे.” जलसंधारणाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, समुद्रात वाहून जाणारे ७५ टीएमसी पाणी वळवून ते अहिल्यानगर, नाशिक आणि मराठवाड्याच्या प्रत्येक तालुक्यात पोहोचवून हा भाग दुष्काळमुक्त केला जाईल. मुळा धरणातील गाळ उपसल्यास अतिरिक्त ३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होईल, त्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करणार आहे.
महिला सक्षमीकरण आणि लाडकी बहीण योजना
महिलांच्या सक्षमीकरणावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘लाडकी बहीण’ सारख्या योजना केवळ निवडणुकीपुरत्या नसून त्या कायमस्वरूपी सुरू राहतील. काहींनी या योजना बंद होतील असा अपप्रचार केला, मात्र त्या अधिक प्रभावीपणे राबवल्या जातील. तसेच विधानसभा आणि संसदेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून, महिलांचा सहभाग वाढवणे हेच लोकशाहीचे यश असल्याचे त्यांनी नमूद केले. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधत त्यांनी स्त्री शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.
राहुरीत औद्योगिक क्रांती आणि ३५ हजार रोजगार
राहुरीच्या विकासासाठी मोठा आराखडा मांडताना मुख्यमंत्री म्हणाले की, राहुरी कृषी विद्यापीठाकडे असलेली अतिरिक्त १ हजार एकर जमीन औद्योगिक वसाहतीसाठी (MIDC) ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच जिल्ह्यात संरक्षण प्रकल्प (Defense Project) येत असून, या माध्यमातून सुमारे ३५ हजार बेरोजगारांना हक्काचा रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. राहुरीतील एसटी डेपो आणि रेल्वेचे प्रलंबित प्रश्नही तातडीने मार्गी लावण्याची ग्वाही त्यांनी दिली.
राजकीय समीकरणे कर्डिलेंच्या बाजूने?
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अक्षय कर्डिले यांच्या कार्याचा आढावा घेतला. सुजय विखे पाटील आणि संग्राम जगताप या युवा नेत्यांच्या जोडीने प्रचाराची धुरा सांभाळल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. या सभेला झालेली विराट गर्दी आणि अरुण तनपुरे यांनी केलेला मुख्यमंत्र्यांचा सत्कार यामुळे राहुरीचे राजकीय समीकरण आता अक्षय कर्डिले यांच्या बाजूने झुकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.