चौंडी । झुंझार न्यूज
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाच्या वतीने आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ‘गोदा ते नर्मदा – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा २०२६’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक जलयात्रेच्या नियोजनासाठी अहिल्यादेवींचे जन्मस्थान असलेल्या श्रीक्षेत्र चौंडी येथे महत्त्वाची आढावा बैठक पार पडली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मंदिरात दर्शन घेऊन त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन केले. ज्या पावन भूमीत अहिल्यादेवींचा जन्म झाला, त्याच भूमीतून या जलयात्रेचा शुभारंभ होणार असल्याने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.

वारसा, विचार आणि विकासाचा त्रिवेणी संगम
ही जलयात्रा केवळ एक उपक्रम नसून ‘वारसा, विचार आणि विकास’ या संकल्पनेवर आधारित एक मोठी लोकचळवळ ठरणार आहे. २५ एप्रिल ते २९ एप्रिल २०२६ या कालावधीत ही यात्रा राज्यभर फिरणार आहे. या माध्यमातून जलव्यवस्थापन, जलसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा व्यापक संदेश जनमानसात पोहोचवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
भावी पिढ्यांसाठी जलसुरक्षेचा संदेश
वाढते जलसंकट पाहता जलसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन आणि पाण्याचा काटकसरीने वापर करणे काळाची गरज बनली आहे. भावी पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी या जलयात्रेच्या माध्यमातून ठोस पावले उचलली जाणार आहेत. “चला, पाण्याचे करूया संवर्धन…, वसुंधराचे होईल रक्षण” या घोषवाक्यासह समाजाच्या सक्रिय सहभागातून ही चळवळ अधिक बळकट केली जाईल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.

या आढावा बैठकीसाठी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, भारतीय जनता पक्षाचे अहिल्यानगर प्रभारी रवीजी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ यांसह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अहिल्यादेवींनी आपल्या कार्यकाळात जलसंधारणाची अनेक कामे केली होती, तोच वारसा पुढे नेत ही जलयात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय आणि सामाजिक स्तरावर जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.




