कोथरूडमध्ये राज्यस्तरीय बैठक संपन्न

पुणे । झुंझार न्यूज

समाजाच्या अनेक पिढ्यांनी आजवर अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध सातत्याने सामाजिक संघर्ष केला आहे. मात्र, या संघर्षातून वैचारिक प्रगती झाली असली तरी आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आता व्यावसायिक क्रांतीची गरज आहे. याच उद्देशाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) प्रणित ‘रिपब्लिकन उद्योग आघाडी’ आता महाराष्ट्रातील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी सज्ज झाली आहे, असे प्रतिपादन आघाडीचे महाराष्ट्र राज्य सचिव कल्पित वाकचौरे यांनी केले.

पुण्यातील कोथरूड येथील लुणावत प्रिझम येथे रिपब्लिकन उद्योग आघाडीच्या ‘महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी’ची बैठक उत्साहात पार पडली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कल्पित वाकचौरे बोलत होते. या बैठकीचे आयोजन वाकचौरे यांनीच केले होते.

 

पिढ्यानपिढ्यांचा संघर्ष आता आर्थिक उन्नतीसाठी
वाकचौरे यांनी आपल्या भाषणात समाजाच्या वास्तव परिस्थितीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “आपल्या आजोबांपासून ते वडिलांपर्यंत सर्वांनीच सामाजिक प्रश्नांवर लढा दिला आहे. आपणही तो लढा पुढे नेत आहोत. मात्र, या संघर्षाचा फायदा केवळ मोजक्याच लोकांपर्यंत मर्यादित राहिला आणि सर्वसामान्य समाज आजही गरिबीतच आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आता तरुणांनी उद्योगाकडे वळणे गरजेचे आहे.”

केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली ‘आर्थिक क्रांती’चे पाऊल

केंद्रीय मंत्री डॉ रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांना केवळ नोकरी शोधणारे न ठेवता, ‘नोकरी देणारे’ (Job Givers) बनवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी रिपब्लिकन उद्योग आघाडी कार्यरत राहणार आहे.

उद्योग क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांना ही आघाडी खालीलप्रमाणे मदत करणार आहे

१. उद्योजकीय प्रशिक्षण आणि योग्य प्रोफाइल तयार करणे.
२. बँक कर्ज मिळवण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन.
३. शासकीय योजनांची सविस्तर माहिती आणि लाभ मिळवून देणे.
४. उद्योगासाठी लागणारी कच्च्या मालाची उपलब्धता आणि फॅक्टरी सेटअपमध्ये मदत.
५. उत्पादित मालासाठी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ (Export-Import) उपलब्ध करून देणे.

या कार्याला तांत्रिक आणि कायदेशीर बळ देण्यासाठी एका शक्तिशाली कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये आयात-निर्यात विभागातील माजी अधिकारी, निवृत्त आयएएस (IAS) व आयपीएस (IPS) अधिकारी, बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी उद्योजक, चार्टर्ड अकाउंटंट (CA), कॉर्पोरेट वकील आणि नामवंत डॉक्टरांचा समावेश आहे.

लवकरच महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात रिपब्लिकन उद्योग आघाडीच्या शाखा स्थापन केल्या जातील आणि राज्यभर प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातील, अशी घोषणा यावेळी करण्यात आली. उद्योग करू इच्छिणाऱ्या तरुणांनी आघाडीशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

संदीप पोलप यांनी आभार मानले. 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *