आश्वी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील शिबलापूरच्या भूमीत इज्तेमाचा भव्य-दिव्य व डोळ्यांचे पारणे फेडणारा दोन दिवशीय कार्यक्रम झाला, त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहकार्य करत भेटी दिल्या .

या इज्तेमागाहसाठी डॉ संजय सांगळे यांनी आपल्या लक्ष्मी लॉन्स येथे जागा उपलब्ध करून दिली तसेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेवरून यंशोसन कार्यालयाने मोलाचे सहकार्य केले तर सचिन पोपळघट यांनी मोफत पाण्याची व्यवस्था केली व बळवंतराव थोरात यांनी वाहनाच्या पार्किगकरिता आपली शेती दिली त्यांच्या सत्कार्यासाठी सर्व मुस्लिम बांधवांनी अभिवादन केल्याचे दिसून आले .

इज्तेमाच्या निमित्ताने जिल्ह्यातून हजारो मुस्लीम बांधव एकत्र आले आणि सर्वांच्या कल्याणासाठी व हितासाठी प्रार्थना केली. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी दाखविलेल्या मार्गावर चालावे, प्रत्येकाने सज्जनता दाखवून सर्वांसोबत नम्रतेने वागावे आणि कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असे मौलानांनी आवर्जून सांगितले. इज्तेमाचा समारोपाच्या वेळी मगरीबच्या (सायंकाळीची नमाज) नमाजनंतर सामुदायिक दुआने झाला. या इज्तेमातून सर्वांना सामाजिक सौहार्दासाठी प्रार्थना केली गेली.

इज्तेमातून सामाजिक सौहार्द जपण्याची दुआ
शिबलापूर व परिसरातून इज्तेमामध्ये मुस्लिम समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी मुस्लिम मौलवी आणि धर्मगुरू उपस्थित होते. यावेळी मौलाना अब्दुल सलाम भाई म्हणाले, “मुस्लिमांसाठी ईमानची ताकद, इस्लामी शिष्टाचार महत्वाचा आहे. तसेच देशही मुस्लिमांसाठी महत्वाचा आहे. मुस्लिमांनी एकत्र येत सामाजिक सौहार्द जपले पाहिजे. एकत्र येऊन मुस्लिमांनी त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणेकडे लक्ष दिले पाहिजे.तरच समाजाची आणि देशाची प्रगती होईल.” तसेच इज्तेमातून मुस्लिमांचे जीवन सुधारवण्याचा, समाजात एकता प्रस्थापित करण्याचा आणि सर्व धर्मांबद्दल आदर निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो. तसेच याठिकाणी मुस्लिमांना इस्लामी शिक्षण आणि सामाजिक जबाबदारीविषयी मार्गदर्शन केले जाते.”

इज्तेमासाठी येणाऱ्या हजारो मुस्लिम समाज बांधवांच्या राहण्याची, खाण्याची जबाबदारी इज्तेमाचे आयोजन करणाऱ्या व्यवस्थापकांची केली होती तर मुस्लिमांच्या या भव्य संमेलनामुळे वाहतूकीचे आणि इतर प्रश्न निर्माण होऊन इतरांना त्रास होऊ नये याचीही विशेष खबरदारी हे स्वयंसेवक घेतली होती.
