प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड

सुजय विखे-संग्राम जगताप यांच्या ‘जय-वीरू‘ जोडीची चर्चा

अहिल्यानगर । झुंझार न्यूज

अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्याच्या राजकारणात महायुतीने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. अत्यंत चुरशीच्या आणि सस्पेन्सने भरलेल्या राजकीय घडामोडींनंतर, भाजपचे प्राजक्त तनपुरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. या विजयामुळे जिल्ह्यात महायुतीची संघटनात्मक ताकद आणि राजकीय प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून, डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्यातील समन्वयाची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

सस्पेन्सचा पडदा पडला, तनपुरे ठरले १८ वे आमदार

नगरची ही निवडणूक सुरुवातीपासूनच चुरशीची होणार असे वाटत होते. मात्र, भाजपकडून प्राजक्त तनपुरे यांचे नाव पुढे आल्यानंतर राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली. नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले तनपुरे आता जिल्ह्याचे १८ वे आमदार ठरले आहेत. त्यांच्या या निवडीमुळे भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून, महायुतीने ही जागा बिनविरोध खेचून आणत विरोधकांना मोठा धक्का दिला आहे.


विखे-जगताप जोडीचा ‘मास्टरस्ट्रोक

या संपूर्ण प्रक्रियेत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांची भूमिका निर्णायक ठरली. उमेदवारी अर्जांच्या माघारीचा पेच सुटण्यामागे या दोन्ही नेत्यांचे सूक्ष्म नियोजन आणि संवाद कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. या दोघांच्या जबरदस्त समन्वयामुळे राजकीय वर्तुळात त्यांची तुलना ‘शोले’मधील ‘जय-वीरू’च्या जोडीशी केली जात आहे. विखे आणि जगताप यांच्या एकत्र येण्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे महायुतीच्या बाजूने झुकल्याचे पाहायला मिळत आहे.


डॉ. सुजय विखे पाटील यांची रणनीती यशस्वी

 

गेल्या चार दिवसांपासून डॉ. सुजय विखे पाटील यांनी या निवडणुकीसाठी विशेष प्रयत्न केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री डॉ . राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही रणनीती आखण्यात आली होती. पक्षाने दिलेली जबाबदारी सुजय विखे यांनी प्रभावीपणे पार पाडली.

यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या वेळीही प्राजक्त तनपुरे यांना निवडणूक लढविण्यापासून परावृत्त करत अक्षय कर्डिले यांचा मार्ग मोकळा करण्यात सुजय विखे यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. त्यावेळी केलेल्या त्यागाचे फळ आज तनपुरे यांना आमदारकीच्या रूपाने मिळाले असून, सुजय विखे पाटील यांनी शब्द पाळल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.


जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली

अहिल्यानगर महानगरपालिका आणि जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात भाजपची पकड आता अधिक घट्ट झाली आहे. सर्वपक्षीय नेत्यांशी समन्वय साधून निवडणूक बिनविरोध करणे, हे महायुतीच्या संघटन कौशल्याचे यश मानले जात आहे. या निकालामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीची हीच ‘जय-वीरू’ जोडी विरोधकांसाठी मोठे आव्हान ठरणार, अशी चिन्हे दिसत आहेत.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *