मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान ज्या आंदोलकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यांच्या वारसदारांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात (MIDC) नोकरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे अंतरवाली सराटी येथील आंदोलनादरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली असल्याची माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या विविध मागण्यांपैकी, मृत आंदोलकांच्या वारसांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी प्रमुख होती. या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाने तातडीने शासन आदेश (GR) जारी केला आहे. मराठा आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांची योग्य पडताळणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी अचूक शहानिशा करून ही कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशा सूचनाही मंत्री विखे पाटील यांनी दिल्या .
सुरुवातीला मृत आंदोलकांच्या वारसांना परिवहन महामंडळात (ST) समाविष्ट करून घेण्याचे ठरले होते. मात्र, अनेक वारसदारांची इच्छा ही औद्योगिक विकास महामंडळ किंवा वीज वितरण कंपनीत काम करण्याची होती. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने प्रशासकीय स्तरावर वेगाने हालचाली केल्या. औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, आता या वारसांना एमआयडीसीमध्ये नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयाबाबत बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांना जे आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता महायुती सरकार करत आहे. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकार अत्यंत संवेदनशील असून, यापूर्वीही अनेक सकारात्मक निर्णय घेतले आहेत. भविष्यातही समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
महाविकास आघाडीकडून कांदा प्रश्नावर केल्या जाणाऱ्या आंदोलनावरही विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आंदोलन करणे हे विरोधी पक्षाचे कामच आहे. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नावर महत्त्वपूर्ण निर्णय झाले आहेत. केंद्र आणि राज्य सरकार दोन्हीही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत आहे.