{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

 

एकलव्य संघटनेचा १० जून रोजी संगमनेर पंचायत समितीवर धडक मोर्चाचा इशारा

आश्वी । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी (वाकन) येथील आदिवासी हिंदू भिल्ल समाजाच्या खासगी मालकीच्या जागेवर ग्रामपंचायत प्रशासनाकडून बेकायदेशीररीत्या ताबा मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप ‘एकलव्य संघटने’ने केला आहे. या प्रकरणी दोषींवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा १० जून रोजी पंचायत समितीवर भव्य निषेध मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

या संदर्भात एकलव्य संघटनेच्या वतीने संगमनेरचे तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांना सविस्तर निवेदन देण्यात आले.


मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हेवाडी (वाकन) येथील गट नं. ३३२/४ मध्ये हिंदू भिल्ल समाजाची ०.८० आर इतकी खासगी जमीन आहे. या जमिनीवर रघुनाथ नारायण खैरे यांच्यासह त्यांचे सख्खे भाऊ तुकाराम, सिताराम, जगन्नाथ आणि सुखदेव खैरे यांची नावे असून, हे सर्व कुटुंब त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून राहतात. या जागेवर त्यांची कौलारू घरे असून ते अत्यंत गरिबीत जीवन जगत आहेत.

संबंधित कुटुंबे आदिवासी व गरीब असल्याचा गैरफायदा घेऊन कोल्हेवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच आणि इतर पदाधिकारी या जागेवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. “विकासकामे करायची आहेत” असे कारण सांगून या कुटुंबांना तिथून हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. वास्तविक, या जमिनीचे कायदेशीर बक्षीस पत्र असताना मालकाशिवाय इतर कोणीही त्यावर ताबा घेऊ शकत नाही, असे असतानाही ग्रामपंचायत प्रशासनाकडून दमदाटी व धमकावण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप पीडित कुटुंबांनी केला आहे.

एकलव्य संघटनेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, या आदिवासी कुटुंबांना आजवर शासनाच्या कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यांना मदत करण्याऐवजी त्यांची हक्काची जमीन हडपण्याचा घाट घातला जात असल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. प्रशासकीय भीतीपोटी हे सर्व कुटुंब सध्या दहशतीखाली वावरत आहेत.

एकलव्य संघटनेचे संगमनेर तालुकाध्यक्ष अनिल बर्डे यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, “जर या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई झाली नाही आणि ही जमीन अधिग्रहित करण्याचे प्रयत्न थांबवले नाहीत, तर संपूर्ण संगमनेर तालुक्यातील आदिवासी समाज एकत्र येऊन १० जून रोजी पंचायत समितीवर मोठा निषेध मोर्चा काढेल. त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहील.”

निवेदन देतेवेळी एकलव्य संघटनेचे पदाधिकारी, बाधित कुटुंबातील सदस्य संगिता खैरे , मंगेश खैरे, सुशिला खैरे, लहाणूबाई माळी, सविता सोनवणे, अंबादास भवर, हिरामण बर्डे व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आता या गंभीर आरोपांवर तहसीलदार आणि गट विकास अधिकारी काय कारवाई करतात आणि आदिवासी कुटुंबांना न्याय मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *