अहिल्यानगर जिल्ह्यातील प्राचीन व नामवंत अशा आश्वी खुर्द विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची ११४ वी वार्षिक सभा मोठ्या गदारोळात पार पडली. सहीच्या अधिकारावरून संचालकांमध्ये संताप, आर्थिक अनियमिततेवर आरोप, तर लाभांश न जाहीर झाल्याने सभेत आंदोलन अशा वातावरणामुळे सभा चांगलीच गाजली.
सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन विजय भोसले होते. यावेळी व्हा. चेअरमन राजेंद्र मांढरे, संचालक मंडळातील विठल गायकवाड, रमेश सोनवणे, ज्ञानेश्वर खर्डे, भाऊसाहेब शिंदे, स्नेहल भवर, प्रशांत कोडोलिकर, भास्कर वाल्हेकर, दत्तात्रय गायकवाड, सौ. सुरेखा गायकवाड, सौ. शोभा गायकवाड, राजेंद्र मुन्तोडे, विठल वर्पे, भाऊसाहेब गाडे, सुरेश गायकवाड, आदिसंह बाळासाहेब मांढरे, मकरंद गुणे, डॉ. दिनकर गायकवाड, अविनाश सोनवणे, कैलास गायकवाड, मोहित गायकवाड, विकास गायकवाड राजेंद्र गायकवाड यशवंत वाल्हेकर रमेश गायकवाड सुरेश सोनवणे शिवाजी शिंदे बापु भवर तुषार सोनवणे अंकुश गव्हाणे हौशिराम गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. सचिव बाळासाहेब गायकवाड यांनी वार्षिक अहवाल सादर केला.
सहीच्या अधिकारावरून वाद
संस्थेच्या घटनेनुसार चेअरमन, व्हा. चेअरमन व आणखी एका संचालकाकडे सहीचा अधिकार असावा; मात्र गेल्या तीन वर्षांपासून बदलणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडे तो न देता फक्त एका जेष्ठ संचालकाकडेच ठेवण्यात आल्याचा आरोप झाला. “इतर संचालकांना अधिकार का दिला जात नाही? पडद्यामागे हीच व्यक्ती संपूर्ण संस्था चालवते, पदाधिकारी फक्त नावालाच आहेत” असा सवाल उपस्थित झाला.
ऑडिट व खत-औषध दुकानातील गोंधळ
ज्ञानेश्वर खर्डे, दत्तात्रय गायकवाड, भास्कर वाल्हेकर यांनी आरोप केला की, मागील सभेत नेमलेले ऑडिटर बदलून परस्पर दुसऱ्याच साध्या सी.ए.कडून ऑडिट करून घेतले. त्यामुळे संस्थेला ‘ब वर्ग’ मिळाला. खत-औषध दुकानातील ताळमेळही लागत नसल्याचे निदर्शनास आले.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा सन्मान नाही
४० वर्षे सेवा केलेल्या कर्मचारी आप्पासाहेब गायकवाड यांच्या निवृत्तीनंतर साधा सत्कारही न केल्याबद्दल संचालकांनी नाराजी व्यक्त केली.
लाभांशावरून आंदोलन
लाभांश न जाहीर झाल्याने सभासद बाबासाहेब भोसले यांनी सभागृहात केळी वाटप करून अनोखे आंदोलन केले. त्यांच्या या कृतीमुळे काही काळ खळबळ उडाली.
शेवटी लाभांश जाहीर
तणावपूर्ण वातावरणात अखेरीस व्यवस्थापनाने सभासदांना ३ टक्के लाभांश जाहीर केला. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले व सभा संपन्न झाली.