आश्वी । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील असणाऱ्या लगडदरा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना खराब रस्त्यामुळे होणारा त्रास लक्षात घेऊन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगडदरा ते पाण्याची टाकी (हजारवाडी रस्ता) या रस्त्याच्या तात्काळ दुरुस्तीचे आदेश दिले आहेत. या रस्त्यावर पाण्याच्या नळ्या टाकून तो त्वरित तयार करण्याच्या सूचना मंत्र्यांनी दिल्या आहेत.
याबाबत नाना पाटील शिंदे, बाळासाहेब जाधव, रावसाहेब घुगे, राजू विठ्ठल जाधव, ग्रामपंचायत सदस्य संजय किसन जाधव, अशोक तळेकर, अशोक सांगळे आणि बाबुराव गोलवड यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन दिले होते. या निवेदनात त्यांनी लगडदरा येथील रस्त्याची दुरवस्था आणि त्यामुळे भाविकांना होणाऱ्या अडचणींकडे लक्ष वेधले होते. रस्त्याची स्थिती इतकी खराब होती की, देवीच्या दर्शनासाठी जाणे अत्यंत कठीण झाले होते.
ग्रामस्थांच्या या मागणीची दखल घेत पालकमंत्री विखे पाटील यांनी तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले. त्यानुसार, जनसेवा कार्यालयाचे अधिकारी प्रवीण शेपाळ आणि दीपक सोनवणे यांनी स्वतः घटनास्थळी येऊन पाहणी केली आणि तात्काळ मदतीची ग्वाही दिली.
या महत्त्वपूर्ण कामासाठी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही मोठे सहकार्य केले असून, ग्रामस्थांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत. डॉ. सुजय विखे पाटील यांनी “देवीसाठी येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारे जाण्या- येण्याकरता अडचण येऊ देऊ नका!” असे सांगत भाविकांच्या सोयीला प्राधान्य दिले आहे.
या निर्णयामुळे लगडदरा येथील भाविकांना आता सुलभपणे देवीचे दर्शन घेणे शक्य होणार आहे. तसेच, हजारवाडी परिसरातील रहिवाशांनाही या रस्त्याच्या दुरुस्तीचा फायदा होणार आहे. पालकमंत्र्यांनी आणि डॉ. सुजय विखे पाटील यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेबद्दल आणि केलेल्या तात्काळ कार्यवाहीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
Post Views: 668




