केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष हा महायुतीचा एक महत्त्वपूर्ण घटक पक्ष म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यात आपली पकड मजबूत करत आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पक्षाच्या शाखा स्थापन झाल्या असून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचे संघटन उभे राहिले आहे. यामुळे कार्यकर्त्यांना राजकीय सत्तेत सहभागी करून घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
राज्याचे उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या मते, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर, कार्यकर्त्यांना सत्तेत योग्य प्रतिनिधित्व मिळावे यासाठी रिपब्लिकन पक्षाला जिल्ह्यातील ४ राखीव जागा, तसेच जिल्हा परिषदेमध्ये २ स्वीकृत जागांची मागणी केली आहे. याशिवाय, प्रत्येक तालुक्यात २ गण आणि १ स्वीकृत सदस्य, तसेच नगरपालिकेतील राखीव जागा आणि १ स्वीकृत जागा रिपब्लिकन पक्षाला मिळावी, अशीही मागणी वाकचौरे यांनी केली आहे.
या मागणीसंदर्भात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास आठवले यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच, लवकरच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे वाकचौरे यांनी सांगितले.
विजयराव वाकचौरे यांनी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपापल्या पातळीवर निवडणुकांसाठी तयारी सुरू करावी. रिपब्लिकन पक्ष हा जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आपली ओळख अधिक दृढ करण्यासाठी सज्ज झाला असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्यास उत्सुक असून या संदर्भात गुरुवार दि. ३० आक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता शिर्डी येथील शासकिय विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक होणार आहे . तरी जिल्हयातील सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन विजयराव वाकचौरे यांनी केले आहे .