आश्वी : राजेश गायकवाड
सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात ३० मार्च २०२६ रोजी एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. ‘राजहंस दूध समूह’ (संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ मर्यादित), महाराष्ट्र PDFA आणि पंजाब PDFA यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “Mission 50L : दुग्धक्रांती पुन्हा एकदा!” या राज्यस्तरीय परिषदेला शेतकरी आणि दुग्ध व्यावसायिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. या परिषदेने केवळ दूध उत्पादन वाढवण्याचा मार्गच दाखवला नाही, तर ग्रामीण युवकांना ‘दूध उद्योजक‘ बनण्याचे नवे स्वप्नही दिले.

पारंपारिक दुग्ध व्यवसायाला आधुनिकतेची जोड देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. राजहंस दूध संघाचे चेअरमन आणि महाराष्ट्र PDFA चे अध्यक्ष रणजीत देशमुख यांच्या दूरदृष्टीतून ही संकल्पना आकारास आली आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली ही चळवळ आता केवळ संगमनेरपुरती मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रासाठी दीपस्तंभ ठरत आहे.
या परिषदेला पंजाब PDFA चे अध्यक्ष दलजीतसिंग गिल, खजिनदार राजपालसिंग आणि समन्वयक उदय तिवारी यांची विशेष उपस्थिती होती. पंजाबमधील प्रगत दुग्ध व्यवसायाचे तंत्रज्ञान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचवणे, हा या मागचा प्रमुख हेतू आहे.
या परिषदेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे रणजीतसिंह देशमुख यांनी दिलेले प्रत्यक्ष प्रात्यक्षिक. त्यांनी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या गायींचे सादरीकरण करून शेतकऱ्यांमधील संभ्रम दूर केला.
पारंपारिक गाय: १५ ते २० लिटर दूध देणारी गाय आणि तिचे व्यवस्थापन.
उच्च उत्पादक गाय: आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य जनुकीय गुणधर्मांच्या (Genetics) आधारे ४० ते ५० लिटर दूध देणारी गाय.
गायीचा बांधा, पोटाचा घेर, पायांची रचना आणि कासेची गुणवत्ता यांसारख्या तांत्रिक बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला. तसेच, ‘सायलेज’ (मुरघास) या आधुनिक खाद्य पद्धतीचा अवलंब केल्यास दूध उत्पादनात कशी शाश्वत वाढ होते, हे त्यांनी वैज्ञानिक पुराव्यांसह पटवून दिले.
आजच्या धावपळीच्या युगात तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता दुग्ध व्यवसायाकडे एक ‘प्रोफेशनल बिझनेस’ म्हणून पाहावे,” असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञान, भेसळमुक्त उत्पादन आणि शास्त्रोक्त व्यवस्थापन यांच्या जोरावर तरुण पिढी उच्च दर्जाचे दूध उत्पादन करून स्वतःची ओळख निर्माण करू शकते. ‘Mission 50L’ मुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत असून युवकांमध्ये एक नवचैतन्य संचारले आहे.
राजहंस दूध संघ आज महाराष्ट्रातील एक अग्रगण्य नाव बनले आहे. ग्राहकांचा विश्वास आणि शेतकऱ्यांची मेहनत यांच्या बळावर संघाने चालू हंगामात ४ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. रणजीतसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणारे ‘मुक्त संचार गोठे’ आणि ‘मुरघास प्रोत्साहन योजना’ यामुळे दूध उत्पादकांच्या आर्थिक स्तरात मोठी सुधारणा होत आहे.
सहकारातून समृद्धीकडे…
संगमनेरचा विकास हा सहकाराच्या भक्कम पायावर उभा आहे. “सहकार आहे तर शेतकरी आहे आणि शेतकरी आहे तरच भविष्य आहे,” हा विचार घेऊन ‘Mission 50L’ ही चळवळ पुढे जात आहे. येत्या ५-६ वर्षांत संगमनेर तालुका हा ५० लिटर दूध देणाऱ्या गाईंचा तालुका म्हणून ओळखला जाईल, असा ठाम विश्वास रणजितसिंह देशमुख यांनी व्यक्त केला आहे .
Post Views: 49







