आश्वी । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील ठोंबरे कुटुंबावर कोसळलेल्या काळाच्या घाताने संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा सुन्न झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील कश्यपी धरण परिसरात फिरायला गेलेल्या सचिन ठोंबरे, त्यांच्या पत्नी रोहिणी ठोंबरे आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा नामदार शालिनीताई विखे पाटील यांनी तात्काळ पिंपरणे गावाला भेट देऊन शोकाकुल ठोंबरे कुटुंबाचे सांत्वन केले.

सचिन आणि रोहिणी ठोंबरे यांच्या अकाली निधनाची वार्ता समजताच शालिनीताई विखे पाटील यांनी आपले सर्व कार्यक्रम बाजूला सारले आणि थेट पिंपरणे गाव गाठले. ठोंबरे यांच्या निवासस्थानी पोहोचताच वातावरण अत्यंत भावूक झाले होते. शालिनीताईंनी कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी सचिन आणि रोहिणी यांच्या आठवणींना उजाळा देताना शालिनीताईं भावूक झाल्या.

याप्रसंगी शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या की, ही घटना अत्यंत क्लेशदायक आणि सुन्न करणारी आहे. तरुण मुला-मुलींचे असे अचानक जाणे हे केवळ कुटुंबाचेच नाही, तर समाजाचे कधीही भरून न निघणारे नुकसान आहे. ठोंबरे कुटुंबावर आलेले हे संकट न पेलवणारे आहे. दुःखाच्या या कठीण प्रसंगात आम्ही सर्वजण ठोंबरे कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या .

हे कुटुंब नाशिक जिल्ह्यातील हर्सूल जवळील कश्यपी धरण परिसरात सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गेले होते. मात्र, निसर्गाच्या सानिध्यात गेलेल्या या कुटुंबावर काळाने झडप घातली. या दुर्घटनेत ठोंबरे दाम्पत्यासह त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दोन सख्ख्या भावांचाही मृत्यू झाल्याने गावात मोठी शोककळा पसरली आहे. एकाच वेळी चार तरुणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण संगमनेर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.


यावेळी स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. पिंपरणे गावावर पसरलेले दुःखाचे सावट आणि शालिनीताईंनी दिलेला आधार यामुळे ठोंबरे कुटुंबाला काहीसा मानसिक आधार मिळाला असला तरी, या भीषण दुर्घटनेने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *