उद्या अर्जांची छाननी; गुरुवारी माघारीनंतरच लढतीचे अंतिम स्वरूप ठरणार
अहिल्यानगर । झुंझार न्यूज
अहमदनगर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय हालचालींना वेग आला. सोमवारी (दि. १) भारतीय जनता पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून माजी मंत्री प्राजक्त प्रसादराव तनपुरे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यांच्यासह अन्य अपक्ष उमेदवारांनीही शड्डू ठोकल्याने या निवडणुकीत आता एकूण ५ उमेदवारांचे ८ अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा झाले आहेत.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपले चार अर्ज दाखल केले. यावेळी महायुतीमधील घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती लक्षणीय होती. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार काशिनाथ दाते आणि शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत तनपुरे यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे आपले अर्ज सुपुर्द केले. महायुतीचे सर्व नेते यावेळी एकजुटीने रिंगणात उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

अपक्ष उमेदवारांचीही गर्दी
भाजपच्या उमेदवाराव्यतिरिक्त सोमवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक दत्तात्रय पानसरे यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य कृषी बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा व इतर पदाधिकारी उपस्थित होते. तसेच, अकोले तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते मच्छिंद्र धुमाळ यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्जाचा संच दाखल केला आहे. यापूर्वीच श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाणे आणि शेवगावचे कमलेश गांधी यांनी अपक्ष म्हणून आपले अर्ज दाखल केलेले आहेत.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २) दाखल झालेल्या सर्व ८ उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. त्यानंतर गुरुवारी (दि. ४) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. या मुदतीत किती उमेदवार माघार घेतात, यावरच निवडणुकीचे खरे चित्र अवलंबून असणार आहे.
१८ जून रोजी मतदान
अहमदनगर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी १८ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. २५ मे पासून सुरू झालेली अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारी संपुष्टात आली. आता सर्वांचे लक्ष गुरुवारी होणाऱ्या माघारीकडे लागले असून, त्यानंतरच प्रत्यक्ष लढत कोणामध्ये होणार हे स्पष्ट होईल.
उमेदवारांची नावे:
१. प्राजक्त प्रसादराव तनपुरे (भाजप/महायुती)
२. करण ससाणे (अपक्ष)
३. कमलेश गांधी (अपक्ष)
४. दत्तात्रय पानसरे (अपक्ष)
५. मच्छिंद्र धुमाळ (अपक्ष)



