संगमनेर । झुंझार न्यूज

संगमनेर शहराचे वैभव आणि राज्याच्या नकाशावर ‘एअरपोर्ट’ म्हणून गौरवला जाणारे संगमनेरचे हायटेक बस स्थानक तब्बल एक वर्षाच्या अनाधिकृत फ्लेक्सबाजीच्या विळख्यातून अखेर मुक्त झाले आहे. शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या सातत्याने मागणीनंतरही काढले न जाणारे हे फ्लेक्स, आता नगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रातोरात हटवण्यात आले आहेत. यामुळे संगमनेर बस स्थानकाने मोकळा श्वास घेतला असून, सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि महाविद्यालयीन तरुणाईमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे आधुनिक बस स्थानक संगमनेर शहराची ओळख बनले आहे. राज्यातील प्रवाशांकडून ‘एअरपोर्ट’ म्हणून गौरवल्या जाणाऱ्या या बस स्थानकात प्रशस्त जागा, शॉपिंग कॉम्प्लेक्स, आधुनिक इमारत आणि आकर्षक प्रवेशद्वार यांसारख्या सुविधा आहेत. हे स्थानक तरुणांसाठी एक लोकप्रिय सेल्फी पॉइंटही बनले आहे.

 

मात्र, मागील एक वर्षापासून हे सुंदर बस स्थानक अनाधिकृत फ्लेक्सने झाकले गेले होते. बस स्थानकाचा दर्शनी भाग पूर्णपणे फ्लेक्सच्या गर्दीत हरवून गेला होता. याबाबत अनेकवेळा तक्रारी करूनही नगरपालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही, ज्यामुळे नागरिकांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. फ्लेक्समुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होऊन अपघातांचे प्रमाण वाढले होते, तसेच सिग्नल व्यवस्थाही स्पष्ट दिसत नव्हती, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती.

यावर आमदार सत्यजित तांबे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांनी लावलेले सर्व फ्लेक्स काढून एक आदर्श निर्माण केला. यापूर्वी, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही मंत्रीपदी असताना बस स्थानकासमोर उभे राहून स्वतःचे फ्लेक्स काढून येथे फ्लेक्सबाजी करू नये असे आवाहन केले होते. त्यांच्या या आदर्शाचे पालन करत आमदार सत्यजित तांबे यांनी हे पाऊल उचलले.

तरीही काही राजकीय पक्षांच्या पुढऱ्यांनी फ्लेक्सबाजी सुरूच ठेवली, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप होता. वारंवार निवेदने देऊनही फ्लेक्स काढले जात नव्हते. मात्र, आता नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने परिस्थिती बदलली. रातोरात सर्व फ्लेक्स हटवण्यात आले आणि संगमनेरच्या हायटेक बस स्थानकाचे सौंदर्य पुन्हा एकदा खुलले.

 

यामुळे व्यापारी वर्गासह सर्वसामान्य नागरिकांनाही आनंद झाला आहे. महाविद्यालयीन तरुणांनी विशेष समाधान व्यक्त केले आहे. प्रांजली खेमनर-अंभोरे आणि तनुजा सोनवणे-चिंचोली गुरव या विद्यार्थिनींनी सांगितले, “संगमनेर बस स्थानक हे आमच्यासाठी अत्यंत आनंदाचे आहे. आपल्या शहरात इतके मोठे बस स्थानक आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, मात्र मागील एक वर्षापासून ते बस स्थानक दिसत नव्हते. आता मोकळे झाल्याने सेल्फी टाकून आम्ही संगमनेरकर असल्याचा अभिमान बाळगत आहोत.

या घटनेमुळे संगमनेर बस स्थानकाला केवळ अनाधिकृत फ्लेक्सबाजीपासून मुक्ती मिळाली नाही, तर त्याचे हरवलेले सौंदर्यही परत मिळाले आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed